विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत येत असताना महायुतीमधील एक वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे आष्टी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुरेश धस यांच्या एका वक्तव्यामुळे भाजप आणि अजितदादा गट आमनेसामने आले आहेत.
या मतदारसंघातून भाजपने माजी आमदार सुरेश धस यांना पुन्हा रिंगणात उतरवले होते. तर अजितदादा गटाने विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांना संधी दिली होती. यावरुन सुरेश धस यांनी अजितदादा गटावर टीकास्त्र सोडले होते. या टीकेला अजितदादा गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपला आष्टी विधानसभेत रोखण्यासाठीच अजित पवार यांनी या मतदारसंघात उमेदवार दिला. पण सध्या जनभावना ही छोट्या पवारांकडे नाही तर मोठ्या पवारांकडे आहे. घड्याळाचे बारा वाजलेत, तुतारीचीच हवा असल्याचेही धस यांनी म्हटले होते. सुरेश धस यांच्या या वक्तव्यावर अजित पवार गट प्रचंड नाराज असल्याचे कळते.
त्यामुळे अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन सुरेश धस यांना प्रत्युत्तर दिले. महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांना लवकरच तुतारीच्या प्रचाराची जबाबदारी मिळणार सुत्रांची माहिती, अशी खोचक टिप्पणी अमोल मिटकरी यांनी केली आहे. त्यामुळे आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजप आणि अजितदादा गटात जुंपण्याची शक्यता आहे.