अकोला : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या झाल्याची घटना घडली आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे राजकीय कनेक्शन असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलं आहे. विरोधकांकडून धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिकी कराड यांच्यावर गंभीर केले जात आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.
सुरेश धस यांच्या आरोपानंतर अमोल मिटकरी यांनी गंभीर आरोप केला आहे. सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना संतोष देशमुख प्रकरणात काही गौप्यस्फोट केले आहेत. 'मी या प्रकरणात नाव घेणार नाही. आकाच्या आदेशाशिवाय हा प्रकार होऊ शकत नाही.
आकाच्या गाड्या सर्व विष्णू चाटेच्या नावावर असून तोच आदेश देत होता. त्यांना क्रुरतेने मारतोय हा प्रकार व्हिडिओ कॉल करून दाखवल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला.
सुरेश धस यांच्या गंभीर आरोपानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्याचं काम बीड जिल्ह्यातील काही राजकीय नेते करत असल्याचे दिसून येत आहे. अमोल दुबे प्रकरणात जे तोंडघशी पडले, ते सुरेश धस हे आज महायुतीचे आमदार आहेत. त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. पण दोन्ही बहीण भावांना मंत्रिपद मिळालं. त्यांना दोन्ही बहीण भाऊ एकत्र आल्याने पोटशूळ सुरु झाला आहे'.
'आमचं म्हणणं आहे की, संतोष देशमुख यांच्या हत्येचं कोणी समर्थन करू शकत नाही. जो कोणी दोषी असेल, त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. ही भूमिका सुरुवातीपासून मांडली. अशीच भूमिका मंत्री धनंजय मुंडे यांनी मांडली. पण आता या प्रकरणात सुरेश धस राजकारण करतात, हे कुठंतरी थांबलं पाहिजे.
त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही. ते महायुतीचे घटक आहेत. संदिप क्षीरसागर यांच्यावर बोलण्यासारखं काही नाही. त्यांच्या वडिलांना कसा आदर करतात, हे दुसऱ्यांबद्दल कसं वागू शकतात. सगळ्यांनी एकत्र दुसरं राजकारण केलं आहे का? हे सुद्धा तपासलं पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.