आज दसऱ्याच्या निमित्ताने राज्यभरात राजकीय नेत्यांकडून कार्यक्रम होत आहेत. तसेच दसरा म्हटलं कि राजकीय वर्तुळात दसरा मेळाव्याची चर्चा होताना दिसते. आज सकाळी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे संघाचा दसरा मेळावा झाला. आज संध्याकाळी ५ वाजता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा वेगवेगळ्या ठिकाणी दसरा मेळावा पार पडला. तर आज दुपारी मंत्री पंकजा मुंडे यांचा बीड येथील सावरगाव येथे भगवान भक्तीगडावर भव्य असा दसरा मेळावा पार पडला.

यानिमित्ताने पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर आलेत. पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणाला सुरूवात करण्याच्या अगोदर आशिर्वाद मंचावर भाषणाला सुरूवात केली. दरम्यान राजकीय कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या बेशिस्त वर्तनामुळे नेत्यांना अनेकदा नाराजी व्यक्त करावी लागते. अशाच एका प्रसंगात, पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरील दसरा मेळाव्यात आलेल्या काही लोकांवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले.
त्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाल्या, “तुम्ही वाटोळं केलं पोरांनो. कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहीत नाही. तुम्हाला शरम नाही, तुम्हाला शरम नाही.” दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या परंपरेचा संदर्भ देत त्यांनी कार्यकर्त्यांच्या वर्तनावर खेद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “जी शरम गोपीनाथ मुंडेंच्या नजरेत होती ना, ती तुमच्यात दिसत नाही आम्हांला.” पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना भगवान गडावरील वर्षानोवर्ष दसरा मेळाव्याचाही उल्लेख केला.
“जो माझा दसरा भगवान गडाचा होता, तोसुद्धा माझ्याहून हिरावून घेतला. आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय असं वाटायला लागलं.” असे त्या म्हणाल्या. इतकी वर्षे भाषणे केली तरी असे बेशिस्त वर्तन कधी पाहिले नाही, असेही पंकजा मुंडे स्पष्ट केले. बेशिस्त लोकांना आपण सांभाळत नाही, असा कठोर इशाराही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.