भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्याला लवकरच लिलाव होण्याची शक्यता आहे. युनियन बँकेने २०३ कोटींच्या कर्ज वसुलीसाठी कारखान्याला लिलावाची नोटीस बजावली आहे. २५ जानेवारीला कारखान्याचा ऑनलाइन लिलाव होणार असल्याचं नोटीसीत नमूद करण्यात आलं आहे.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यातील परळी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आहे. स्वत: पंकजा या कारखान्याच्या संचालक आहेत. मात्र, मागील काही वर्षात कारखान्यावर अनेक बँकेचे कर्ज झाले.
यात युनियन बँकेच्या २०३ कोटींच्या कर्जाचा समावेश आहे. थकीत कर्जाची वसुली होत नसल्याने बँकेने नोटीस काढत कारखान्याचा लिलाव करण्याची जाहिरात काढली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी हा राजकीयदृष्ट्या मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
त्यामुळे आता पंकजा मुंडे काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.