सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर पद्धतीने झालेल्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्रालाच हादरा बसला होता. या हत्येननंतर बीडमध्ये होणारे गैरप्रकार, धमक्या आणि हत्येचे अनेक प्रकरणे समोर अली आहे. त्यातील एक महत्त्वपूर्ण आणि धक्कादायक म्हणजे महादेव मुंडे यांची झालेली हत्या. बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घृण हत्येला तब्बल 18 महिने उलटूनही अद्याप कुटुंबाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता मुंडे कुटुंब आक्रमक झाले आहे.
महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे गेल्या कित्येक दिवसांपासून न्यायासाठी एसपी ऑफिसच्या उंबरठ्यावर चकरा मारत आहेत. मात्र चौकशीला कुठलाही वेग दिसत नाही. न्याय मिळत नसल्याकारणाने ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानूसार आज ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधिकक्ष कार्यलयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह आई-वडील आणि मुले सर्वजण पोलिसांविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पोलिसांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याकडील दोन पेट्रोलच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर ज्ञानेश्वरी मुंडे आणि पोलीस यांच्यात झटापट झाल्याचं पहायला मिळालं.