भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडें यांच्या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. उड्डाणापूर्वीच बिघाड झाल्याचे लक्षात आले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगरवरून लातूरकडे हेलिकॉप्टरने निघाल्या होत्या. पण हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे उड्डाणापूर्वीच पायलटच्या लक्षात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
आगामी जिल्हापरिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी मंत्री पंकजा मुंडें आज (3 फेब्रुवारी) लातूरसह सोलापुरला जाणार आहे. सोलापुरातील मंद्रूप आणि कुंभारी अशा दोन ठिकाणी संध्याकाळी 6 आणि 8 वाजता पंकजा मुंडेंच्या सभा होणार आहेत. दरम्यान, काल (2 फेब्रुवारी) पंकजा मुंडें या छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेसाठी वाळूज परिसरात सभा घेतली होती. यावेळी प्रचार सभेत बोलताना त्या म्हणाल्या होत्या कि, 'जिल्हा परिषदेच्या प्रचारादरम्यान मी हेलिकॉप्टरने फिरते म्हणून माझी आई देव पाण्यात ठेवते', असे वक्तव्य त्यांनी केलं होतं. अशातच आज सकाळी त्यांच्या हेलिकॉप्टर उड्डाण घेण्यापूर्वीच बिघाड झाल्याचे निष्पन्न झालंय.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंडे लातूर दौऱ्यावर जाणार होत्या मात्र टेकऑफपूर्वीच हेलिकॉप्टरच्या पायलटला तांत्रिक बिघाड असल्याचे निष्पन्न झालं. परिणामी पंकजा मुंडेंनी आपला प्रवास आणि सभांच्या वेळा पुढे ढकलल्या असल्याची माहिती आहे. हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे आता दुसऱ्या हेलिकॉप्टरने पंकजा मुंडें या लातूर येथील सभांना हजेरी लावणार असल्याची माहिती आहे.