जळगाव : आपलं लग्न जरा हटके आणि अविस्मरणीय असायला हवे अशी अनेकांची इच्छा असते. निवडणुकीच्या धामधुमीत जळगावमध्ये सध्या अशाच एका हटके लग्नाची चांगलीच चर्चा आहे. त्याचं कारण म्हणजे, आपल्या लाडक्या बायकोला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं. मग काय अख्खं गाव नवरीला पाहण्यासाठी हेलिपॅडवर पोहचलं. चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथील ही एका लग्नाची गोड कहाणी आहे.
लग्न म्हणजे आपल्या आयुष्यातील एक आनंदाचा दिवस असतो. आपल्या लग्नातील आठवणी अविस्मरणीय राहाव्यात यासाठी प्रत्येकजण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. चाळीसगावमध्ये सध्या नवरदेवाच्या या हटके स्टाईलची चांगलीच चर्चा आहे.
चाळीसगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकरी भिकन रामचंद्र परदेशी यांची नात प्रिया हिचा विवाह सोहळा सोमवारी चाळीसगाव येथील कोदगाव चौफुली येथे पार पडला. छत्रपती देविसिंग ठाकूर यांचे चिरंजीव चेतन ठाकूर यांच्यासोबत हा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला.
या लग्नात नवरदेवाने आपल्या पत्नीला सरप्राइज देत संभाजीनगर येथील व्यावसायिक चक्क हेलिकॉप्टरने आपल्या नववधूला आपल्या घरी गंगापूर येथे घेऊन गेला. गावात प्रथमच असा एक अनोखा सोहळा पार पडला. यावेळी समस्त रांजणगावकर आपल्या गावाच्या मुलीला सोडवायला हेलिपॅडवर उपस्थित होते. या नवदाम्पत्याला त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी सर्व रांजणगावकरांनी शुभेच्छा दिल्या.