भारतीयांमध्ये ‘लग्न’ या समारंभाला विशेष महत्त्व आहे. इथल्या प्रत्येक मुलीला आणि मुलाला लग्न करायचं असतं. दोघांच्या लग्नासाठी वयही निश्चित करण्यात आलं आहे. एखाद्याचं लग्न जमलं नाही तर शेजारी तसेच नातेवाईक त्याला टोमणे मारायला लागतात. असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशातील दमोह येथे राहणाऱ्या एका तीस वर्षांच्या तरुणासोबत घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दीपेंद्र राठोड असे या तीस वर्षीय तरुणाचं नावं असून त्याचं लग्न झालेले नाही. दीपेंद्र राठोड ई-रिक्षा चालवतो. लग्न जमत नसल्यामुळे त्यांने अनोखी शक्कल लढवली आहे. दीपेंद्रने त्याच्या ई-रिक्षात एक मोठे होर्डिंग लावलं आहे, ज्यामध्ये त्याने त्याची संपूर्ण माहिती दिली आहे. या होर्डिंगवर त्यांने शिक्षण, उंची, रक्तगट अशी सर्व माहिती दिली असून शहरभर तो या रिक्षातून फिरत असतो. जिथे तो ई-रिक्षा घेऊन जातो, तिथे लोक होर्डिंगवर काय लिहिलं आहे, ते वाचू लागतात. त्यामुळे तो शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

तो 30 वर्षांचा आहे, दीपेंद्रला लग्न करायचं आहे, मात्र अद्याप त्याच्यासाठी कोणतही स्थळ आलेलं नाही. त्यामुळे त्याला असं करण भाग पडलं आहे, असं तो सांगतो. होर्डिंगवर त्यांनं एक खास गोष्ट देखील लिहिली आहे, लग्न करताना जात-धर्माचे कोणतेही बंधन नाही. कोणत्याही जाती-धर्माची मुलगी किंवा तिचे नातेवाईक त्याच्याकडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन येऊ शकतात.
मिळालेल्या माहितीनुसार , दीपेंद्रच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाबद्दल अनेकदा बोलणी केली आहेत, मात्र, प्रत्येकवेळी कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांचं नातं तुटलं आहे. लग्न न केल्याने लोक त्याला टोमणे मारू लागले. यामुळे त्यांने हा अनोखा मार्ग स्वीकारला आणि रिक्षाच्या मागे लग्नासाठीचा बायोडेटाच लावला आहे. आता दीपेंद्रसाठी अनेक स्थळं येत असल्याचं सांगितलं जात आहे.