भयंकर घटना! लग्नसोहळा सुरू असताना मंडपात भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी
भयंकर घटना! लग्नसोहळा सुरू असताना मंडपात भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी
img
Dipali Ghadwaje
उत्तर इराकच्या नेवेहमधील अल-हमदानिया भागात भीषण दुर्घटना घडली आहे. एका लग्न मंडपात भीषण आग लागली असून यात वधू आणि वरासह १०० जणांचा जळून मृत्यू झाला. तर १५० हून अधिक नागरिक जखमी झाले आहे. नेवेह प्रांत मोसुलच्या बाहेर राजधानी बगदादपासून जवळपास ३३५ किमी अंतरावर आहे.या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इराकमधून एक भयानक घटना समोर आली आहे. लग्नसोहळा सुरू असताना अचानक एका हॉलमध्ये भीषण आग लागली. या आगीत वधू वरासह जवळपास १०० हून अधिक वऱ्हाड्यांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे. तर जवळपास १५० जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.  इराकच्या उत्तर निनेवे प्रांतातील अल-हमदानिया जिल्ह्यात मंगळवारी (२६ सप्टेंबर) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. 

या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त होत आहे. नेमकी ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र फटाके पेटवल्यानंतर आग लागल्याचे प्राथमिक माहितीमध्ये समोर आले आहे.

एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हमदानिया जिल्ह्यात मंगळवारी एका लग्नसोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला वधू आणि वराकडील हजारो वऱ्हाड्यांची उपस्थिती होती. लग्न लागताच काही लोकांनी हॉलबाहेर फटाके फोडण्यास सुरुवात केली.

यातील एक फटाका लग्नाचा मंडपात येऊ फुटला. त्यामुळे क्षणात मंडपाला आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केले. इराकच्या नागरी संरक्षण संचालनालयाने सांगितले की, 'मंडपात अत्यंत ज्वलनशील वस्तू होत्या. त्यामुळे आगीने भीषण रुप धारण केलं. त्याचबरोबर कमी किमतीच्या बांधकाम साहित्याचा वापर केल्यामुळे हॉलचा काही भाग कोसळला. त्यामुळे १०० हून अधिक वऱ्हाडी होरपळले. यामध्ये वधू आणि वराचा देखील समावेश आहे. 

दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीत होरपळलेल्या वऱ्हाड्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आलं. मात्र, या आगीत आतापर्यंत शेकडो वऱ्हाड्यांचा मृत्यू झाला असून १५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल सुदानी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलंय. त्याचबरोबर घटनेत जखमी झालेल्या लोकांना मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहे. इराकच्या पंतप्रधान कार्यालयाने X वर एका पोस्टमध्ये माहिती दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group