"या" ठिकाणी विसर्जन मिरवणुकीदरम्यान तणाव , अजूनही विसर्जन नाही....
img
Dipali Ghadwaje
मुंबई : गणेश विसर्जन मिरवणुकी संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ढोल-ताशाच्या गजरात भक्तीभावाने गणपती बाप्पाला निरोप देत असताना  मुंबईतील भिंवडी आणि बुलढाण्यातील जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटामध्ये वाद झाला. या वादामुळे परिसरात काही वेळासाठी तणाव निर्माण झाला. दोन गटात वाद निर्माण झाल्यामुळे  जळगाव जामोद शहरातील 15 गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणूक जागेवरच थांबवून जोपर्यंत दोषींवर कारवाई पोलीस करणार नाहीत तोपर्यंत विसर्जन करणार नाही अशी भूमिका घेतली होती. तर भिवंडीत काल रात्रीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या गोंधळानंतर  वातावरण शांत  आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी विसर्जन मिरवणुकीत  रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास  दोन गटात वाद निर्माण झाला. वादानंतर  संपूर्ण परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काही काळ रस्त्यातच धरणे आंदोलन केलं होतं. मात्र  परिसरात तणाव वाढण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यामध्ये काही नागरीक आणि काही पोलिसही जखमी झाल्याची माहिती आहे.

या घटनेनंतर शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे अशी माहिती सहपोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली आहे. सीसीटिव्ही तपासून अज्ञात व्यक्ती आणि मारहाण करणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे.

मात्र आज ईदच्या पार्श्वभूमीवर पुन्हा या परिसरात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.  सर्व भागात पोलिसांचे पथके आहेत, परिस्थिती देखील नियंत्रणात आहे.

हेही वाचा >>> नाशिकरोड उड्डाणपुलावर अपघात....विवाहित तरुणाचा मृत्यू

मिरवणूक सुरु करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू

बुलढाण्यातील  जळगाव जामोद शहरात दोन गटात वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर जळगाव जामोद शहरातील 15 गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणूक जागेवरच थांबली होती. जोपर्यंत दोषींवर कारवाई पोलीस करणार नाहीत तोपर्यंत विसर्जन करणार नाही अशी भूमिका घेतली होती.  मात्र अद्यापही विसर्जन मिरवणूक ही जागेवरच आहे.  पोलिसांनी  विसर्जन मिरवणूक लवकर व्हावी यासाठी मंडळांशी बोलणे सुरू आहे मात्र त्यात अद्यापही यश आलेलं नाही. 

 

  
इतर बातम्या
Join Whatsapp Group