राज्यातील महापालिका निवडणुकांचा धुरळा उडाला आहे. १५ जानेवारी २०२६ ला मतदान होणार असून १६ जानेवारी २०२६ ला मतमोजणी म्हणजेच निकाल लागणार आहे. त्याआधीच राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून येत आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर राजकीय चित्र अधिक स्पष्ट होत आहे.
जळगाव मनपा निवडणूक प्रभाग क्रमांक १८ अ मधील उमेदवार तथा चोपडा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ. गौरव सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. कारण, येथील गौरव सोनवणेंच्या विरोधातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार मयूर सोनवणे यांनी माघार घेतल्याने शिवसेना शिंदे गटाचे डॉ. गौरव सोनवणे हे बिनविरोध निवडून आले आहे.
महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवडींची मालिका कायम असून, अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून प्रभाग क्रमांक १८ ‘अ’ मधून शिवसेनेचे उमेदवार गौरव चंद्रकांत सोनवणे हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा होताच महानगरपालिका परिसरात जल्लोष साजरा केला.
राज्यात भाजपचे ६ उमेदवार विजयी झाल्यानंतर आता जळगावामध्ये शिवसेना शिंदे गटाचा एक उमेदवार विजयी झाल्यानं महायुतीचे राज्यात ७ उमेदवार बिनविरोध झाल्याचं पाहायला मिळत आहे.