नाशिक : एक लाख रुपयांची लाच मागून तडजोडीअंती 80 हजार रुपयांची लाच घेताना खोंडेवाडा (ता. एरंडोल, जि. जळगाव) येथील सरपंचासह आणखी दोन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.भानुदास पुंडलिक मते (वय 44, सरपंच रिंगणगाव, रा. खोंडेवाडा, एरंडोल, जि. जळगाव), समाधान काशीनाथ महाजन (वय 38) व संतोष नथ्थू पाटील (वय 49) अशी लाच घेणार्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, की तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असून, त्यांनी जलजीवन मिशनअंतर्गत नळपाणीपुरवठा योजनेत 1 कोटी 50 लाख 23 हजार 321 रुपये रकमेचे काम केले होते. या कामाचे तक्रारदार यांना याअगोदर 1 कोटी 27 लाख 23 हजार 321 रुपयांचे जलजीवन मिशनअंतर्गत शासनाच्या आदेशाप्रमाणे सुरू करून 18 मार्च 2024 रोजी पूर्ण केले आहे.
त्यांना पूर्ण केलेल्या कामाच्या रकमेपैकी उर्वरित 23 लाख रुपयांची रक्कम मिळण्यासाठी त्यांनी जळगावच्या जिल्हा परिषदेत प्रकरण सादर केले होते; परंतु जलजीवन मिशनअंतर्गत पूर्ण झालेले काम ताब्यात घेण्यासाठी सरपंच यांचा करारनामा अपूर्ण असल्याने कामाचे अंतिम देयक प्रलंबित होते. त्यासाठी तक्रारदार यांनी सरपंच भानुदास मते यांना भेटून करारनामा करून देण्याची विनंती केली.
तेव्हा सरपंच मते, ग्रामपंचायत सदस्यांचे पती समाधान महाजन यांनी हस्तांतर करारनामा देण्यासाठी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी दि. 6 ऑक्टोबर रोजी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. विभागाने सापळा रचल्यानंतर संतोष पाटील यांना सरपंच मते व समाधान महाजन यांच्यासाठी 80 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.