जळगाव : बँड पथकाला कामाला असलेले तिघेजण दुचाकीने कामानिमित्ताने जळगावकडे येण्यासाठी निघाले होते. गावातून निघाल्यानंतर विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेले दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळ झालेल्या अपघातात तेजस सुनील बिऱ्हाडे (वय २१) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तेजस हा नशिराबाद येथे आई- वडील, भाऊ आणि बहीण यांचेसह वास्तव्यास होता.
दरम्यान तेजस हा गावातील त्याचे मित्र तुषार युवराज बिन्हाडे (वय १९) व अजय सपकाळे (वय २२) हे जळगावातील खानदेश बँड पथक येथे कामाला आहेत. लग्नसराई असल्याने त्यांचे रोज काम सुरु होते.
गावापासून काही अंतरावर जाताच अपघात दरम्यान १५ मे रोजी जळगाव येथे बँड पथकाचे काम करण्यासाठी तेजस बिऱ्हाडे, तुषार बिऱ्हाडे आणि अजय सपकाळे हे दुचाकीने नशिराबाद येथून ट्रिपल सीट निघाले होते.
गावापासून काही अंतरावर आल्यावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव डंपरने तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तिघेजण रस्त्यावर दूरवर फेकले गेले. या अपघातामध्ये तेजस बिऱ्हाडे याचा जागीच मृत्यू झाला. तर तुषार व अजय या गंभीर जखमी झाले होते.
दरम्यान अपघात झाल्याची माहिती गावात समजताच ग्रामस्थ अपघातस्थळी दाखल झाले. अपघातात जखमी तरुणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर तेजसचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
अपघातातील डंपर आणि चालक नशिराबाद पोलिसांनी जमा केले आहे. तर या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.