महाराष्ट्रात पुन्हा 'सैराट'! जावयावर वार करत घरच्यांनीच पुसलं लेकीचं कुंकू, कुठे घडली मन सुन्न करणारी घटना?
महाराष्ट्रात पुन्हा 'सैराट'! जावयावर वार करत घरच्यांनीच पुसलं लेकीचं कुंकू, कुठे घडली मन सुन्न करणारी घटना?
img
Dipali Ghadwaje
जळगावमध्ये  प्रेमविवाह केलेल्या 26 वर्षीय तरुणासह त्यांच्या कुटंबावर जुन्या वादातून हल्ला केल्याची घटना उघडकीस आली असून त्यामुळे अख्खं शहर हादरलंय. या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जळगावच्या पिंप्राळा हुडको येथे सासरच्या लोकांनी  आपल्याच लेकीच्या कपाळाचं कुंकू पुसत जावयाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडलीय. आपल्या घरातील मुलीशी 5 वर्षांपूरवी केलेल्या लव्ह मॅरेजचा सूड उगवत कुटुंबियांनी तरूणाची हत्या केली. कोयत्याने वार करून त्याला संपवण्यात आलं.

याप्रकरणी जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर मयत तरूणांच्या कुटुंबातील सात जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. मुकेश रमेश शिरसाठ असे मृत तरूणाचे नाव असून या निर्घृण हत्याकांडामुळे अख्ख्या शहरात खळबळ माजली आहे.

काय आहे प्रकरण ?

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावमध्ये ‘सैराट’ सारखी घटना घडली आहे. मुकेश रमेश शिरसाठ याने जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरातील पूजा या तरूणीशी पळून जाऊन लग्न केलं. त्यांचं हे लव्ह मॅरेज मुलीकडच्यांना पसंत नव्हतं, यामुळे त्यांच्या मनात मुकेशबद्दल राग होता. त्यांच्या लग्नाला 5 वर्ष झाली तरी तेव्हापासूनच दोन्ही कुटुंबात सतत वाद होत होते, अजूनही ते वाद कायम होते.या वादाचे पर्यवसान रविवारी थेट हाणामारीत झाले. रविवारी मुकेश हा कामासाठी घराबाहेर पडला, तेव्हा त्याच्या सासरच्या काही लोकांनी त्याला घेरलं आणि त्याच्यावर कोयता व चॉपरने वार करत प्राणघातक हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या मुकेशचा जागीच मृत्यू झाला.

मुकेशवर हल्ला झाला तेव्हा त्याला वाचवण्यासाठी त्याचे भाऊ, काका, काकू, दोन चुलत भाऊ, चुलत बहीण मध्ये आले, मात्र मुलीच्या कुटुंबियांनी त्यांच्यावरही वार केल्याने तेही जखमी झाले. त्यांच्यावर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
 
या हत्याकांडाने अख्ख जळगाव हादरलं असून परिसरांत मोठा तणाव आहे. मुकेशच्या निर्घृण हत्येमुळे कुटुंबियांचा मोठा आक्रोश सुरू आहे. या घटनेमध्ये मयत तरुणाच्या कुटुंबीयांच्या नातेवाईकांच्या वतीने आज आरोपींचे घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सध्या पोलिसांनी येथे मोठा बंदोबस्त तैनात केला असून अजूनही तणाव आहे. याप्रकरणी 10 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group