बीड : राज्यात आज (दि.12) जवळपास 5 दसरा मेळावे पार पडत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पहिल्यांदाच नारायण गडावर दसरा मेळावा घेत आहेत. तर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा नेहमीप्रमाणे भगवान गडावर पार पडणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याकडे राज्याचे लक्ष असताना पंकजा मुंडे यांनी त्यांच्या मेळाव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
पंकजा मुंडे म्हणाल्या, नारायण गडावर मनोज जरांगेंचा आज पहिल्यांदा मेळावा होत आहे. आमचा मेळावा अनेक वर्ष होत आहे, आमचा मेळावा पारंपारिक आहे. मनोज जरांगे काय बोलणार? याची आम्हालाही उत्सुकता आहे. आमचा कार्यक्रम पारंपारिक आहे. आमचा अनेक वर्ष झाले आम्ही करतोय. त्यांचा कार्यक्रम यावर्षी होत आहे. त्यामुळे त्याच्यात काही एकमेकांशी संबंध असण्याचं कारण नाही. माझ्या मेळाव्याला मीडिया कालपासून कव्हर करतोय. माझ्या मेळाव्याला मुस्लिम येणार आहेत, बौद्ध बांधव येणार आहेत. माझ्या मेळाव्याला सर्व जाती धर्माचे लोकं येणार आहे. आमचं दसरा मेळाव्याचं उद्दिष्ट सिम्मोलंघनापर्यंत मर्यादीत आहे.
पंकज मुंडे पुढे बोलताना म्हणाल्या, भगवान भक्ती गडावर मी गेल्या दहा वर्षापासून दसरा मेळावा करत आहे. सात वर्षांच्यावर सावरगाव येथे हा मेळावा होत आहे. त्या ठिकाणी आम्ही भगवान बाबांची मूर्ती निर्माण केली आहे. धनंजय मुंडे आणि मी आम्ही एकत्र कधीच दसरा मेळावा केला नाही. दसरा मेळावा हा मुंडे साहेबांचा असायचा, आणि आम्ही समोर मांडी घालून बसलेला असायचो, आम्ही काय भाषण करायचो नाही. या भगवानगडावरून मी संदेश देत असते. यावर्षी पहिल्यांदाच नारायण गडावर दसरा मेळावा होत आहे, त्या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील काय बोलणार याची मलाही उत्सुकता आहे.