राज्यात तापला आरक्षणाचा मुद्दा; आता ओबीसीं चे उपोषण सुरु
राज्यात तापला आरक्षणाचा मुद्दा; आता ओबीसीं चे उपोषण सुरु
img
Jayshri Rajesh
राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 1 महिन्याचा अवधी देत आपलं उपोषण मागे घेतलं. मात्र, दुसरीकडे जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे जाऊन लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी उपोषण सुरू केलं आहे. त्यामध्ये, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. या आंदोलनाला पाठिंबा वाढत असून आज ओबीसी नेत्या पंकजा मुंडे व मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट दिली. यावेळी, पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी केली आहे. 

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलनाला भेट दिली. त्यावेळी, उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांच्याशी संवाद साधला.

 मुख्यमंत्र्यांकडे पंकजा मुंडेंची मागणी

आमच्या आंदोलनकर्त्या ओबीसी बांधवांनी ज्या मागणी केल्या आहेत, त्या अनेक मागण्या आहेत. मात्र, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही हे समजावून सांगा, अशी  मागणी पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे. तसेच, अवैध पद्धतीने ओबीसी प्रमाणपत्र दिले जात असतील तर श्वेतपत्रिका काढून त्याबाबतचा निर्णय घ्या, अशीही आंदोलकांची मागणी आहे. 

मराठा आरक्षणाला  विरोध नाही

 मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र देण्यात  येत असतील, चुकीच्या पद्धतीने ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत असेल, तर यांचं समाधान, तुमचं समाधान आणि माझं समाधान करणारं उत्तर सरकारने द्यावं, अशी मागणीही पंकजा यांनी उपोषणस्थळावरुन केली आहे. तसेच, या दोन्ही उपोषणकर्त्यांना पाणी देऊन सन्मानाने त्यांचं उपोषण सोडण्यासाठी येथे यावं, असेही त्यांनी म्हटलं. 

दरम्यान मुंबईत राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांची ओबीसी आरक्षणाच्या आंदोलन कार्यकर्त्यांनी भेट घेतली. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडें आणि छगन भुजबळ  हे तिन्ही नेते सत्तेत असून लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा जोरदार फटका बसल्यानंतर ओबीसी नेते एकत्र येऊ लागल्याचे चित्र आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group