पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला प्रथमच धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपण यंदा दसरा मेळाव्याला येणार असल्याची माहिती दिली. विचारांचे सोने लुटायला या वर्षी प्रथमच मीही येतोय, असे ट्वीट धनंजय मुंडे यांनी केलेय.
१२ ऑक्टोबर रोजी भगवान भक्तीगडावर सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहे. हा दसरा मेळावा खास राहणार आहे, कारण पहिल्यांदाच धनंजय मुंडे हजेरी लावणार आहे. दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे काय बोलणार? याकडे बीडमधील जनतेचं लक्ष लागलेय.
पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यातून बीड जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरत असते. मात्र आता या मेळाव्याला महायुतीचेच नेते असलेले धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत. महायुतीमध्ये असल्यामुळे भाऊ-बहीण पहिल्यांदाच दसरा मेळाव्यात एकत्र दिसणार आहेत.
धनंजय मुंडे यांची पोस्ट -
पंकजा मुंडे काय म्हणाल्या -
तर दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना आणि भगवान बाबांच्या भक्तांना सूचना करत आवाहन केलं आहे. हा आपला दसरा अन् आपली परंपरा आहे. आपण हुल्लडबाजी करायला कधीही प्रोत्साहन देत नाहीत, त्यामुळं शिस्तीचं अन् संस्काराचे पालन करून मेळाव्याला या. अशा सूचना देत वेळेवर मेळाव्याला या, असं आवाहन करत पंकजा मुंडे यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे.
या व्हिडिओत पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत, की मी पंकजा गोपीनाथ मुंडे, दरवर्षी मी असा व्हिडिओ करते. खूप तरुण, खूप युवा, खूप लोक या मेळाव्याला राज्यभरातून येतात. प्रचंड उत्साह आहे, प्रचंड फोन करतात, ताई या ताई या असं म्हणत आम्ही येतोय, असं म्हणतात, जरूर या तुमचे स्वागत आहे. मेळावा तुमचाच आहे, मीच तुमच्या बोलावण्याने येते. परंतु येताना काही गोष्टीची काळजी घ्या.