एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत होती. या व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणात त्यांचावर पक्षाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत कुंडलिक खांडे यांची हकालपट्टी करत असल्याची घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
खांडे यांच्या पक्षविरोधी कारवाया
बीडचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे शिवराज बांगर यांची कथित ऑडिओ क्लिप मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुंडलिक खांडे यांच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना लोकसभा निवडणुकीत मदत केल्याची कबुली दिल्याचा संवाद आहे. लोकसभा निवडणूक निकालापूर्वीची कथित ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे. त्यामुळे बीडच्या राजकारणात जोरदार हालचाली होताना दिसत आहेत. दरम्यान, एबीपी माझा या कथित ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
खांडे यांना पोलीस कोठडी
या प्रकरणी चर्चेत असलेले शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तीन दिवसाची कोठडी सुनावली आहे. आपल्याच पक्षाच्या उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणातील आरोपी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेला बीडच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पक्षाकडून हकालपट्टी
तीन महिने जुन्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने पहाटे कुंडलिक खांडेला अटक केले होते. पंकजा मुंडेंचा राजकीय विश्वासघात, धनंजय मुंडेंची गाडी फोडण्याचा कट आणि मनोज जरांगे यांच्याबद्दल एकेरी वक्तव्याच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे वादग्रस्त ठरलेला शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेवर कायद्याचा फास आता आवळला जात आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर तीन महिन्यापूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आरोपी होते. एकीकडे कोर्टाने पोलीस कोठडी सुनावणी आधीच पक्षाकडून कुंडलीक खांडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.