प्रसिद्ध उद्योजक, टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आल्याचं वृत्त निराधार आहे. कमी रक्तदाबाचा त्रास होत असल्याने रतन टाटा यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल कऱण्यात आल्याचं बोललं जात होतं. पण रतन टाटा यांनी स्वत: इंस्टाग्रामला पोस्ट शेअर करत आपण बरे असल्याची माहिती दिली आहे.
सोमवारी रात्रीपासून त्यांची प्रकृ्ती बिघडल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र यावेळी प्रकृती उत्तम असल्याची माहिती स्वतः टाटा यांनी दिली आहे. टाटाचे सर्व्हेसर्वा रतन टाटा हे ८६ वर्षांचे असून नियमित तपासणीसाठी ते रूग्णालयात दाखल झाले होते.
रतन टाटांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये काय लिहिलं आहे?
माझ्या आरोग्यासंबंधी काही अफवा पसरत असल्याची मला कल्पना असून, मला प्रत्येकाला त्यात काही तथ्य नसल्याचं सांगायचं आहे. माझ्या वयामुळे आणि वैद्यकीय कारणांमुळे सध्या माझी वैद्यकीय तपासणी सुरु आहे. चिंतेचं कोणतंही कारण नाही. माझी प्रकृती सध्या ठणठणीत आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये. मी एकदम व्यवस्थित असून, लोकांना आणि मीडियाला कोणतीही चुकीची माहिती न पसरवण्याची विनंती करतो असं रतन टाटा यांनी सांगितलं आहे.