केरळ: मागच्या वर्षी जुलै महिन्यात केरळच्या अलप्पुळा जिल्ह्यात 15 वर्षांच्या एका मुलाचा नेग्लेरिया फॉवलेरीमुळे (ब्रेन इटिंग अमीबा) मृत्यू झाला होता. त्याच सुमारास परदेशातही त्याचा संसर्ग झाल्याच्या काही घटना घडल्या होत्या. त्यामुळे या जीवघेण्या संसर्गबद्दल लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली होती. या वर्षी पुन्हा भारतात या अमीबाचा संसर्ग झाल्याचं दिसून आलं आहे.
केरळमध्ये या दुर्मीळ संसर्गामुळे पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या मुलीवर ‘प्रायमरी अमीबिक मेनिंजोएन्सेफलायटिस (पॅम) या आजारासाठी उपचार सुरू होते. हा आजार म्हणजे नेग्लेरिया फॉवलेरीमुळे होणारा दुर्मीळ संसर्ग आहे. या संसर्गाने आतापर्यंत जगभरात अनेकांचा जीव गेला आहे. या संसर्गाविषयी सविस्तर जाणून घेऊ या. एका वृत्त संस्थेने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
हा नवीन व्हायरस आहे तरी काय?
नेग्लेरिया फॉवलेरी हा मुक्त अवस्थेत आढळणारा एकपेशीय जीव आहे. हा जीव जगभरात उबदार गोड्या पाण्यात आणि मातीमध्ये आढळतो. तलाव, नद्या, जलतरण तलाव, स्प्लॅश पॅड्स, सर्फ पार्क यांसारख्या ठिकाणी नेग्लेरिया फॉवलेरी अमीबा आढळू शकतो. स्वच्छता नसलेल्या ठिकाणी हा अमीबा आढळण्याची जास्त शक्यता असते. हा मेंदू खाणारा हा अमीबा सर्व खंडांमध्ये आढळून आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतासह 16 हून अधिक देशांमध्ये पॅम हा धोकादायक संसर्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे. अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार (सीडीसी), नेग्लेरिया फॉवलेरी कोमट पाण्याच्या ठिकाणी वेगाने पसरतो. तो नाकातून मानवी शरीरात प्रवेश करतो आणि नंतर मेंदूपर्यंत पोहोचतो. हळूहळू तो मेंदू निकामी करतो. परिणामी व्यक्तीचा मृत्यू होतो.
केरळमधल्या कोळिकोडे इथे पॅममुळे मृत्यू झालेल्या मुलीने एका जवळच्या नदीत आंघोळ केली होती. त्यानंतर मुलीला संसर्ग झाल्याचं कळलं आहे. 1 मे रोजी तिच्यासह इतर चार मुलांनीदेखील नदीत आंघोळ केली होती; पण फक्त तिलाच लक्षणं दिसून आली. उर्वरित मुलांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. या अमीबाचा संसर्ग पिण्याच्या पाण्यातून होत नाही आणि तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत नाही.
पॅमच्या सुरुवातीच्या टप्प्यात डोकेदुखी, ताप, मळमळ, उलट्या ही लक्षणं दिसतात. नंतर रुग्णाच्या मानेच्या हालचालीवर मर्यादा येतात. त्याला भास, सीजर्स किंवा भ्रमदेखील होऊ शकतात. रुग्ण कोमातही जाऊ शकतो. यूएस सीडीसीच्या माहितीनुसार, ‘पॅमची लागण झालेले बहुतांश जण लक्षणं दिसू लागल्यानंतर 1 ते 18 दिवसांच्या आत मरण पावतात. साधारणपणे पाच दिवसांनंतर रुग्ण कोमात जातो किंवा त्याचा मृत्यू होतो.
नेग्लेरिया फॉवलेरीचा संसर्ग झपाट्याने वाढतो. शास्त्रज्ञांना अद्याप या संसर्गावर कोणतेही प्रभावी उपचार सापडलेले नाहीत. सध्या, रुग्णांवर ॲम्फोटेरिसिन बी, अझिथ्रोमायसिन, फ्लुकोनाझोल, रिफाम्पिन, मिल्टेफोसिन आणि डेक्सामेथासोन यांसारख्या औषधांच्या मिश्रणाने उपचार केले जातात.
देशात आतापर्यंत पॅमची एकूण 20 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. कोळिकोडमधल्या मुलीची केस हे केरळमधलं सातवं प्रकरण आहे. 2016मध्ये अलप्पुळा इथे पॅमचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर मलप्पुरम, कोळिकोड आणि त्रिशूरमध्ये पॅमचे रुग्ण आढळले होते.