मुंबई : मुंबईतील एका सरकारी रुग्णालयात चक्क सफाई कर्मचारीच रुग्णांची तपासणी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई महापालिकेच्या चेंबूरमधील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयातील एक गंभीर प्रकार समोर आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , उपचारासाठी आलेल्या रुग्णाची तपासणी सफाई कर्मचारी करत आहे. हा सफाई कर्मचारी रुग्णांचे ECG करत आहेत. समाजवादी पार्टीच्या मुंबई अध्यक्ष आणि माजी नगरसेविका रुकसाना सिद्धी यांनी हा प्रकार समोर आणला आहे.
शताब्दी रुग्णालयात रोज हजारोच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात, परंतु या ठिकाणी रुग्णांना तपासण्यासाठी डॉक्टरांची आणि कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी भरती न झाल्याने रुग्णांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्यातच, येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांची तपासणी सफाई कर्मचारी करत असल्याचे समोर आल्याने चांगलाच गोंधळ उडाला असून रुग्णालयातील भीषण वस्तुस्थितीच समोर आली आहे.
रुकसाना सिद्दिकी यांनी रुग्णालयाचे अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला असता डॉक्टर कर्मचारी यांची कमतरता आहे आणि ह्या सफाई कर्मचाऱ्यांना याचं प्रशिक्षण दिलं आहे, असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिल्याने नेमकं काय चाललयं, असा गंभीर प्रश्न पडला आहे.
विशेष म्हणजे सफाई कर्मचारीच गेले काही दिवस हे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे, याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी रुक्साना सिद्दिकी यांनी केली आहे. तसेत, यासंदर्भात पोलिसात तक्रार दिली असल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलतना सांगितले.