गोंदिया : सरकारने बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कारवाई केलीय. पण तरीही बोगस डॉक्टरांनी गोरखधंदा मांडल्याचे अनेक प्रकार समोर येत असतात. आता गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे नव्या हॉस्पिटल चालवत असलेला डॉ. नीतेश बाजपेयी याचा काळा धंदा उघड झाला आहे. बोगस दवाखाना सुरू करून याठिकाणी वेगवेगळे तज्ज्ञ डॉक्टर येत असल्याचं बोर्डावर दाखविले. या दवाखान्यात तो डॉक्टर म्हणून गेल्या सहा महिन्यापासून कार्यरत आहे. इतकंच नाही तर दवाखान्यात चक्क अवैध गर्भपातही केल्याचं समोर आलं आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नीतेश बाजपेयी याने नावासमोर एमडी. डीएनबी अशी उपाधी लावली आहे. मात्र हा डॉक्टरच नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक अमरीश मोहबे यांनी सांगितले आहे. एवढेच नाही तर ज्या दिवशी जिल्हा शल्य चिकित्सक आणि पोलिसांनी या दवाखान्यावर धाड मारली तेव्हा एक महिला दवाखान्यात होती. ती दीड महिन्याची गर्भवती होती. या दवाखान्यामध्ये अवैध गर्भपात केला जात असल्याचं उघडकीस आलं. या घटनेमुळे गोंदियात खळबळ उडाली.
दवाखान्यावर कारवाई करत बोगस डॉक्टर यांच्या विरूध्द विविध कलमाद्वारे पोलीस स्टेशन गोरेगाव येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आता तरी या बोगस डॉक्टरांच्या अंकुश बसेल का आणि अवैध रित्या होत असणारे गर्भपात थांबतील का अशा प्रश्न आता नागरिकांना पडत आहे.
विशेष बाब म्हणजे नितेश वाजपाई यांच्यावर कोविड काळामध्ये अवैध रूपाने हॉस्पिटल उघडल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी आपली डिग्री बीएएमएस दाखवली होती परंतु याबाबत संबंधित युनिव्हर्सिटीला विचारणा केले असता त्यांची डिग्री ही बोगस असल्याचे त्यांनी सांगितले होते.