बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची फसवणूक; लेखाधिकार्‍यासह अधीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची फसवणूक; लेखाधिकार्‍यासह अधीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची फसवणूक व आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी उपसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी व जळगावच्या अधीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नाशिकरोड येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब भिकनराव चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की आरोपी उदय पंचभाई हे शिक्षण उपसंचालक कार्यालयात लेखाधिकारी, तर राजमोहन शर्मा हे माध्यमिक वेतन पथक, जळगावचे अधीक्षक म्हणून काम पाहत होते.

या दोन्ही अधिकार्‍यांनी संगनमत करून दि. २१ डिसेंबर २०२३ ते दि. २७ मार्च २०२५ या कालावधीत विभागातील शाळांचे बेकायदेशीर बनावट शालार्थ आयडी तयार केले व त्या आयडीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक व्यवहार, तसेच इतर व्यवहार केल्याचे काही काळानंतर लक्षात आले.

आरोपी उदय पंचभाई व राज शर्मा यांनी बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची फसवणूक व आर्थिक नुकसान केल्याची बाब उघड झाली असून, या दोघांनी याव्यतिरिक्त संस्थेच्या इतर शाळांतील कर्मचार्‍यांचादेखील या प्रकरणात सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

बनावट शालार्थ आयडी प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.  या प्रकरणी शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात लेखाधिकारी पंचभाई व अधीक्षक शर्मा यांच्याविरुद्ध शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group