विल्होळीजवळ आढळलेल्या ‘त्या’ इसमाचा खून;
विल्होळीजवळ आढळलेल्या ‘त्या’ इसमाचा खून; "हे" कारण आले समोर
img
दैनिक भ्रमर

सातपूर (भ्रमर वार्ताहर) :- विल्होळीजवळ निर्जनस्थळी आढळून आलेल्या ‘त्या’ इसमाचा खून झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले असून, या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, दोन जण फरार आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातपूरच्या कामगारनगरमध्ये राहणारा सूरज घोरपडे (वय 45) याचा मृतदेह विल्होळीजवळ निर्जनस्थळी आढळून आला. तालुका पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करीत हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला. मृतदेह शवविच्छेदनाकरिता जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला होता, त्यात हा घातपात असल्याचे स्पष्ट झाले. तालुका पोलीस ठाण्यात प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

पोलीस पथकाच्या कर्मचार्‍यांनी माहिती काढली असता संशयित शशी गांगुर्डे याच्याशी सूरज घोरपडे याचा वाद असल्याची माहिती त्यांना मिळाली. तो त्र्यंबकेश्‍वरला असल्याचे समजताच गुन्हे शाखा यूनिट 1 च्या पथकाने काल सायंकाळी त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. 

मयत सूरज घोरपडे याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्याने 10 मे रोजी त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो त्या व्हॉटसअ‍ॅप स्टेटसवर पोस्ट केला होता. याचा राग आल्याने अनैतिक संबंध असलेल्या महिलेने त्याला फोन करून त्रास दिला. तिला जाब विचारण्यासाठी सूरज तिच्या घरी गेला असता नवीन सोनकांबळे याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने सूरजला डोक्यावर मारहाण केली. नंतर शशिकांत गांगुर्डे व अजय कांबळे हे सूरजला विल्होळीत एका निर्जनस्थळी घेऊन गेले.

तिथे त्यांनी सूरजच्या डोक्यावर व पोटावर वार करत ठार मारले. या प्रकरणी किरण घोरपडे यांच्या फियार्दीवरुन तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. एस. आमले करीत आहेत. आरोपी महिला व मयत सूरज हे एकमेकांना 5 वर्षांपासून ओळखत होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group