जीएसटी विभागातील कर्मचाऱ्याने एकाची तब्बल सव्वा कोटींची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. यामुळे मानसिक तणावातून नाशिकच्या अंबड येथील प्रवीण सोनवणे यांनी मामेभावाच्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
स्वतःच्या मुलांसह नातेवाईकांच्या मुलांना नोकरी लावून देण्यासाठी संशयित सचिन चिखले याला प्रवीण सोनवणे यांनी तब्बल सव्वा कोटी रुपये दिले. मात्र, दोन वर्ष उलटून नोकरी नाही आणि पैसेही परत मिळाले नसल्याने प्रवीण सोनवणे यांनी मानसिक तणावातून मामेभावाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या पूर्वी प्रवीण सोनवणे यांनी एक चिठ्ठी लिहून त्यात सचिन चिखलेंचा उल्लेख देखील केला आहे. सचिन चिखले याच्याविरोधात नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, संशयित सचिन चिखले हा जीएसटी विभागात कर्मचारी असल्याची माहिती असून त्याचा शोध नाशिक पोलीस घेत आहे. सचिन चिखले याने प्रवीण सोनवणे यांच्यासह आणखी किती लोकांची फसवणूक केली आहे? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आत्महत्येपूर्वी प्रवीण सोनवणे यांनी लिहिलेली चिठ्ठी आणि त्यांचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून अंबड पोलीस पुढील तपास करत आहेत.