पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी दोन पोलिसांना अटक करण्यात आली. ससून रुग्णालयातील कैद्यांच्या उपचार कक्षात नियुक्तीस आलेल्या दोन पोलिसांनी कर्तव्यात कसुरी करुन पाटील याला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.
ललित पाटील प्रकरणात पुणे पोलीस दलातील नाथा काळे आणि अमित जाधव या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना अटक करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबरला ललित पाटील पुण्यातील ससुन रुग्णालयातून पळून गेला होता, तेव्हा हे दोन पोलीस कॉन्स्टेबल ससुन रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या 16 नंबर वॉर्ड बाहेर पहारा देत होते. कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना अटक करण्यात आली आहे. ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत अटक कालेल्या या दोन पोलीस कॉन्स्टेबलसह दहा पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.
ससून रूग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मेफेड्रोनची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने ३० सप्टेंबर रोजी ललितचा साथीदारासह ससून रुग्णालयाच्या उपाहारगृहातील कामगाराला अटक केली. त्यांच्याकडून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. तपासात ससूनच्या वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये उपचार घेणारा ललित अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर उपचार घेणाऱ्या ललितला नोटीस बजाविण्यात आली. त्याला ताब्यात घेण्याची कारवाई सुरु असतानाच २ ऑक्टोबर रोजी ललित बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन रुग्णालयातून पसार झाला.
या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशी सुरू केली. चौकशीत दोषी आढळलेल्या बंदोबस्ताला असलेला एक सहायक निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक आणि सात पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) ललितला पसार होण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून पोलीस नाईक नाथाराम काळे आणि अमित जाधव यांना अटक करण्यात आली.