कल्याणमधील एका नामांकित रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. आत्महत्येसाठी चक्क या डॉक्टरने दहा बिअर पिल्या आणि तब्बल ४५ झोपेच्या गोळ्या खाल्या. संबंधित डॉक्टर विवाहित असून त्यांची पत्नी मोठी डॉक्टर आहे.
माहितीनुसार, संबंधित डॉक्टरचे एका नर्ससोबत प्रेमसंबंध होते. या नात्यातून नर्सकडून वारंवार लग्नासाठी तगादा लावला जात असल्याने ते मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती आहे. याच नैराश्यातून संबंधित डॉक्टरने दहा बिअर प्राशन करून तब्बल 45 झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.
घटना उघडकीस येताच त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी विष्णू नगर पोलिस ठाणे येथे आत्महत्येच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि डोंबिवली परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.