देशातील ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यानंतर आज टाटा समूहाच्या नव्या अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. टाटा समूहाचे नवे अध्यक्ष म्हणून नोएल टाटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मुंबईमध्ये टाटा समूहाच्या झालेल्या बैठकीमध्ये हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे तब्बल १०० देशांमध्ये पसरलेल्या टाटांचे बलाढ्य साम्राज्य नोएल टाटा हे सांभाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टमध्ये त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यात आला. शक्यतेप्रमाणे रतन टाटा यांचे बंधू नोएल टाटा यांची निवड झाली. नोएल हे पूर्वीच सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि टाटा ट्रस्टमध्ये विश्वस्त आहेत. या ट्रस्टची टाटा समूहाच्या टाटा सन्समध्ये 66% हिस्सेदारी आहे. टाटा ट्रस्टची जबाबदारी आता त्यांच्या खाद्यांवर आली आहे.
पारसी समाजाची अगोदरच मंजूरी
नोएल टाटा यांच्या नावावर पारसी समाजाने अगोदरच शिक्कामोर्तब केले होते. टाटा अडनाव असलेली व्यक्ती टाटा समूहाची उत्तराधिकारी असावी असा समाजाचा आग्रह होता. तर रतन टाटा यांनी मात्र टाटा अडनाव असलेली व्यक्तीच या पदावर असेल असे नाही, असे यापूर्वी स्पष्ट केले होते. पण नोएल टाटा अगोदरच टाटा समूहाशी संबंधित अनेक विश्वस्त मंडळात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची या पदासाठी निवड होणार हे जवळपास निश्चित समजण्यात येत होते.
नोएल यांची कार्यशैली ही रतन टाटा यांच्यापेक्षा अगदी वेगळी मानण्यात येते. प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणे त्यांना आवडते. सध्या टाटा ट्रस्टमध्ये दोन उपाध्यक्ष आहेत. यामध्ये टीव्हीएस के वेणु श्रीनिवासन आणि माजी संरक्षण सचिव विजय सिंह यांचा समावेश आहे. हे दोघेही 2018 पासून उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
कोण आहेत नोएल टाटा?
नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. रतन टाटा यांच्या वडिलांचं नाव नवल टाटा तर आईचं नाव सोनी टाटा होतं. 1940 च्या दशकात नवल टाटा आणि सोनी टाटा यांच्यात घटस्फोट झाला. त्यानंतर नवल टाटा यांनी सिमोन यांच्याशी लग्न केलं. या दोघांच्या मुलाचं नाव नोएल टाटा आहे. नोएल टाटा सध्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे ट्रस्टी आहेत. दोन्ही ट्रस्टची त्यांच्याकडे 66 टक्के भागिदारी आहे. टाटा सन्स ही टाटा ग्रुपची पॅरेंट कंपनी आहे. नोएल टाटा हे गेल्या 40 वर्षांपासून टाटा ग्रुपचे सदस्य आहेत. टाटा इंटरनॅशनल, वोल्टास, टाटा इनवेस्टमेंट कॉर्पोरेशनचे ते चेअरमन आहेत. टाटा स्टील आणि टायटन कंपनीचे व्हाईस चेअरमन आहेत. नोएल टाटांच्या नेतृत्त्वात ट्रेंटचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला.