मुंबई : पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये धमकीचे फोन सतत येत असतात. मुंबई शहर उडवण्याचे तर कधी कोणाचा घात करण्याचे, त्यामुळे मुंबई पोलिस सतत सर्तक राहून काम करते. दरम्यान पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये फोन आला. रतन टाटा यांच्या संदर्भात फोनवर बोलण्यात आलं. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांची सुरक्षा वाढवा अन्यथा ते देखील सायरस मिस्त्री होतील, असं अनोळख्या व्यक्तीनं फोनवर धमकी दिली. या घटनेनंतर पोलिस कंट्रोल रुममध्ये मोठी खळबळ उडाली.
दरम्यान पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्र वेगानं हलवत आरोपीचा शोध घेतला आणि त्याला तात्काळ बेड्या ठोकण्यात आल्या. दरम्यान पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला बेड्या ठोकल्या, त्याच्या चौकशीत सदर व्यक्ती मनोरुग्ण असल्याचं समोर आलं आहे.
तर धमकीचा फोन आल्यानंतर मुंबई पोलीस पूर्ण अलर्ट मोडमध्ये आले. तात्काळ तपासाची सूत्रं हलवण्यात आली. एका पथकाला रतन टाटा यांच्या सुरक्षेती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर दुसऱ्या पथकाला धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्या कॉलरशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण कॉलरचा फोन बंद होता. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक मदतीनं आणि टेलिकॉम कंपनीच्या मदतीनं कॉलरचा शोध घेतला असता, त्याचं लोकेशन कर्नाटक असल्याचं समजलं. त्यानंतर धमकी देणाऱ्याचा पत्ता शोधला असता फोन करणारा पुण्याचा रहिवासी असल्याचं समोर आलं. पोलिसांनी तात्काळ पुण्यातील घरी धडक दिली. त्यावेळी आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. धमकीचा फोन करणारी व्यक्ती गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता असल्याची बाब समोर आली. तसेच, सदर व्यक्तीच्या पत्नीनं यासंदर्भातील तक्रार पोलिसांत केल्याचंही समोर आलं.
चौकशीदरम्यान, कॉलरला स्किझोफ्रेनियाचा त्रास होता आणि त्यानं कोणालाही न सांगता घरून फोन घेतला आणि त्याच फोनवरून त्यानं मुंबई पोलिसांच्या कंट्रोल नंबरवर फोन केला आणि रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलं. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, धमकीचा फोन करणारी व्यक्ती मानसिक आजारी आहे, त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. त्यानं फायनान्समध्ये एमबीए केलं असून अभियांत्रिकीचंही शिक्षण घेतलं आहे.