मुंबई : भारतीय नौदलानं नुकतंच हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात आपलं वर्चस्व दाखवून दिलं होतं. 16 मार्च रोजी त्यांनी व्यापारी जहाजाची सोमालियन चाच्यांच्या तावडीतून सुटका केली होती. तसंच 35 सोमालियन चाचे ताब्यात घेतले होते. आता कस्टम आणि इमिग्रेशनच्या औपचारिकतेनंतर हे चाचे मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
काय आहे प्रकरण
अरबी समुद्रात भारतीय हद्दीतील एका व्यापारी जहाजाला बंदी बनवलेल्या सोमालियाच्या ३५ समुद्री चाच्यांना भारतीय नौदलानं कोंडीत पकडलं होतं. तसेच त्यांना समर्पण करण्यासाठी भाग पाडलं होतं. या समुद्री चाच्यांना ताब्यात घेतल्यानंतर आज नौदलानं त्यांना मुंबई पोलिसांच्या हवाली केलं. याचा व्हिडिओ देखीलसमोर आला आहे.
सीमा शुल्क आणि इमिग्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३५ सोमालिया समुद्री चाच्यांना नौदलानं मुंबई पोलिसांच्या हवाली केलं. १६ मार्च रोजी नौदलानं हे अँटी पायरसी ऑपरेशन केलं होतं.
नौदलाच्या INS कोलकातानं या समुद्री चाच्यांना ताब्यात घेतलं होतं. या सर्व चाच्यांना मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्डमध्ये आणण्यात आलं आहे. याच ठिकाणी त्यांचा ताबा मुंबई पोलिसांकडं देण्यात आला.
नौदलाची मोहिम काय होती?
भारतीय नौदलानं भारतीय समुद्र किनाऱ्यापासून १४०० नॉटिकल माईलवर असलेल्या एका व्यापारी जहाजावर कब्जा करणाऱ्या ३५ सोमालियन समुद्री चाच्यांना आत्मसमर्पणाशिवाय कुठलाही पर्याय ठेवला नव्हता. त्यानंतर नौदलाच्या जवानांनी या जहाजावरील १७ चालक दलाच्या सदस्यांची सुखरुप सुटका केली होती.
नौदलानं आपल्या पी-८१ कोस्टगार्ड विमान, फ्रन्टलाईन जहाज, आयएनएस कोलाकात आणि आयएनएस सुभद्रा आणि मानवरहित विमान तैनात केलं होतं. या मोहिमेसाठी सी-१७ विमानातून खास मार्कोस कमांडोंना जहाजावर उतरवण्यात आलं होतं.