गणेशोत्सवासाठी पोलीस सज्ज; एक लाख गणसेवक मदतीला, प्रत्येक मंडळात गणसेवकांची नियुक्ती
गणेशोत्सवासाठी पोलीस सज्ज; एक लाख गणसेवक मदतीला, प्रत्येक मंडळात गणसेवकांची नियुक्ती
img
Dipali Ghadwaje
मुंबई : देशात गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. कधी एकदा बाप्पाचे आपल्या घरी आगमन होते, याकडे लहान मोठे असे सगळ्यांचेच लक्ष लागलेले असते. बाप्पाच्या आगमनासाठी सर्वच आतूर झालेले दिसून येतात. अशातच गणेशोत्सव हा मुंबईतील सर्वात मोठ्या उत्सवापैकी एक समजला जातो. देशाभरातून लाखो गणेशभक्त बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईत येतात. 

या उत्सवादरम्यान कोणतीही अप्रिय आणि अनुचित घटना घडू नये यासाठी मुंबई पोलिसांद्वारे खबरदारी घेतली जात आहे. यासाठी हजारो पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

त्यामुळे यंदा गणेशोत्सावदरम्यान पोलिसांच्या मदतीसाठी मुंबईतील प्रत्येक गणेश मंडळांमध्ये गणसेवक नियुक्त केले जाणार आहेत. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीसोबत झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

गणेशोत्सवात मुंबईमध्ये वाढणारी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांवरील ताण कमी व्हावा यासाठी एक लाख गणसेवकांची फौज बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून तयार करण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून या गणसेवकांना पोलिसांकडून प्रशिक्षण देण्यात येईल. 

मुंबईचा गणेशोत्सव जोरदार साजरा व्हावा आणि हा उत्सव साजरा करताना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अधिक सज्ज राहावे यासाठी समितीने हा प्रस्ताव मुंबई पोलिसांकडे ठेवला होता. पोलिसांनी समन्वय समितीच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला असून छोट्या गणेशोत्सव मंडळातील 10 तर मोठ्या गणेशोत्सव मंडळातील 20 असे मुंबईत एकूण एक लाख गणसेवक काम करतील. हे गणसेवक वेळोवेळी पोलिसांसोबत समन्वय करतील. 

मुंबईत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. या दहा दिवसांच्या उत्सवात गणेशभक्तांसह सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये तसंच पोलीस आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राहावा, यासाठी हा निर्णय घेतला आहे. 

मुंबईसह उपनगरांमध्ये लहान-मोठे हजारो गणेश मंडळं आहेत. या मंडळांमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. सोबतच गणपतीचा आगमन सोहळा आणि विसर्जन मिरवणुकीतही भक्तांची संख्या मोठी असते. अशा परिस्थितीत बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी हल्ल्याचा धोका असतो. त्यामुळे जवळपास एक लाख गणसेवकांची सेना पोलिसांच्या मदतीला असल्याने त्यांचा ताण काहीसा कमी होईल अशी अपेक्षा आहे.  

गणसेवकांना पोलिसांकडून ओळखपत्र
दरम्यान प्रत्येक गणेश मंडळात नियुक्त असलेल्या गणसेवकांना पोलिसांकडून ओळखपत्र देखील देण्यात येईल. जवळपास एक लाख गणसेवक आपापल्या मंडळाच्या मंडप आणि आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवतील. मंडपाजवळ कोणतंही संशयास्पद वाहन उभं असेल तर याची माहिती तातडीने पोलिसांना देतील.

इतर बातम्या
Join Whatsapp Group