मुंबई पोलिसांना फोनवरुण धमकी देण्याचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत मोठा घातपात करण्याची धमकी देण्यात आली होती. ही घटना ताजी असतांना दक्षिण मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा मुंबईत घातपात करण्यात येणार असल्याचा धमकीवजा फोन आला. यावेळी धमकी देणाऱ्याने नावे घेतली असून गुजरातची समा आणि काश्मीरचा आसिफ हा मुंबईत घातपात करणार असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्याच्या निशाण्यावर असल्याचं म्हटलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने फोनवर माहिती दिली की, "मुंबईत मोठा कांड होणार आहे". महत्त्वाचं म्हणजे जुलै महिन्यातही मुंबई पोलिसांना असे धमकीचे फोन आले होते, यावेळी 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेबाबत सतर्क राहण्याची सूचना संबंधित पोलीसांना दिल्या.
मंगळवारी रात्री मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा धमकीचा कॉल आला. फोनवरील व्यक्तीने मुंबईत मोठा घातपात होणार असल्याचा दावा केला. कॉल कंट्रोलमध्ये उपस्थित असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने त्याच्याकडून अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला.
एका अधिकाऱ्याने सांगितलं की, समा नावाची गुजरातच्या जमालपूर येथे राहणारी महिला आसिफ नावाच्या काश्मिरी इसमाशी संपर्क असून ते मुंबईत मोठा कांड करणार असल्याचा कॉलरचा दावा आहे. एटीएसचे अधिकारी आपल्याला ओळखत असल्याचा शोएब नावाच्या कॉलरने दावा केला आहे. समा आणि आसिफचे फोन नंबर देखील पोलिसांच्या हवाली केले आहे. मुंबई पोलिसांनी तपासाला सुरवात केली आहे.