एअर इंडियाकडून मतदान करणाऱ्यांसाठी फ्लाईट तिकीटवर खास ऑफर; आत्ताच जाणून घ्या
एअर इंडियाकडून मतदान करणाऱ्यांसाठी फ्लाईट तिकीटवर खास ऑफर; आत्ताच जाणून घ्या
img
Dipali Ghadwaje
देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आज देशात पहिल्या टप्प्यातील निवडणूक होत आहे. या पहिल्या टप्प्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या पहिल्या टप्प्यात भाजपसह काँग्रेसचेअनेक मात्तबर नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. दरम्यान देशातील एअर इंडिया एक्सप्रेसने मतदानाचा प्रचार करण्यासाठी एक मोठी घोषणा केली आहे.

एअरलाइन प्रथमच मतदारांसाठी (18-22 वर्षे) तिकिटांवर विशेष सवलत देईल. जे लोक पहिल्यांदा मतदान करण्यासाठी त्यांच्या घरी जात आहेत त्यांना विमान तिकिटावर 19 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. लोकांना मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी एअर इंडिया एक्सप्रेसने #VoteAsYouAre मोहीम सुरू करण्याची घोषणा केली होती.

 

या मोहिमेअंतर्गत, एअरलाइन्स 18 ते 22 वर्षे वयोगटातील तरुणांना सवलत देत आहेत जे प्रथमच त्यांच्या मताधिकाराचा वापर करतील. कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मतदाराला संबंधित मतदारसंघाच्या जवळच्या विमानतळावर जाण्यासाठी ही सूट मिळेल. ही सूट 18 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधीतच उपलब्ध असेल. सवलतीच्या तिकिटांचे बुकिंग एअरलाइनचे मोबाइल ॲप आणि वेबसाइट https://www.airindiaexpress.com द्वारे केले जाऊ शकते.

एअर इंडिया एक्स्प्रेसचे सीईओ अंकुर गर्ग म्हणतात की एअर इंडिया एक्सप्रेसने नेहमीच समाजातील बदलासाठी काम केले आहे. कंपनी 19 व्या वर्धापन दिनाच्या तयारीत आहे. अशा वातावरणात कंपनीने आपला खास उपक्रम #VoteAsYouAre मोहीम सुरू केली आहे.

ऑफरसाठी मतदार ओळखपत्र दाखवणे आवश्यक
एअर इंडिया एक्सप्रेसच्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, ग्राउंड स्टाफला तुमचे मतदार ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे. विमानतळावर बोर्डिंग पास घेताना ग्राहकांना त्यांचे मतदार ओळखपत्र दाखवावे लागेल.

देशभरात 31 ठिकाणी कंपनीची सेवा
टाटा समूहाची विमान वाहतूक कंपनी एअर इंडिया एक्स्प्रेस भारतातील 31 स्थळांसाठी उड्डाण करते. यामध्ये पंजाबचे अमृतसर, उत्तर प्रदेशचे अयोध्या, दिल्ली, गोवा, गुवाहाटी, ग्वाल्हेर, हैदराबाद, मणिपूरचे इंफाळ, इंदूर, मध्य प्रदेशचे जयपूर, केरळचे कन्नूर, कोची आणि कोझिकोड, कोलकाता, लखनौ, श्रीनगर, रांची, पुणे, मुंबई, वाराणसी आदींचा समावेश आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group