विमान प्रवाशांची वाढती संख्या आणि सुरक्षेचा मुद्दा विचारात घेत ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी या विमानतळाची सुरक्षा हाताळणाऱ्या यंत्रणेने प्रवाशांच्या सामानासंदर्भात नवे नियम जारी केले आहेत.
त्यामुळे आता विमानाने प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांना सामान नेण्याबाबत दक्ष राहावे लागणार आहे. हवाई वाहतूक मंत्रालयाने हँडबॅगसाठी नवीन नियम जारी केले आहेत. या अंतर्गत प्रत्येक विमानामध्ये प्रवासी फक्त एकच हॅण्डबॅग घेऊन जाऊ शकतील. या अगोदर प्रवासी ७ किलो वजनाला दोन हॅण्डबॅगमध्ये विभागून घेऊ जाऊ शकत होते.
त्यावर आता निर्बंध घातले गेले आहेत, नव्या नियमांनुसार केवळ एकच बॅग तुम्ही हातात घेऊन जाऊ शकता. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) ने सुरक्षा व्यवस्था सुव्यवस्थित करण्यासाठी नवीन हँड बॅगेज नियम आणले आहेत.
इकॉनॉमी आणि प्रीमियम इकॉनॉमी क्लासमधील प्रवाशांसाठी ७ किलोपर्यंतच्या हँडबॅगला परवानगी आहे आणि प्रथम श्रेणी आणि बिझनेस क्लासमधील प्रवाशांसाठी १० किलोपर्यंतच्या हँडबॅगला परवानगी आहे. सामानाचा आकार ४० सेमी (लांबी), २० सेमी (रुंदी) आणि ५५ सेमी (उंची) पेक्षा जास्त नसावा.
तसेच जर तुम्ही 2 मे 2024च्या आधी तिकीट बुक केलं असेल तर तुम्हाला सवलत मिळणार आहे. इकोनॉमी क्लासमधील प्रवाशांना 8 किलोपर्यंत बॅग नेता येणार आहे. प्रीमियम इकोनॉमीसाठी 10 किलो आणि फर्स्ट किंवा बिझनेस क्लाससाठी 12 किलो वजनाची सूट देण्यात आली आहे. पण ही सूट केवळ 2 मे 2024 च्या आधी बुक करण्यात आलेल्या तिकीटांना लागू होणार आहे. जर तुम्ही या तारखेनंतर तिकीटात काही बदल केले तर तुम्हाला नवा नियम लागू होणार आहे.