मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. थंडीच्या प्रमाणात वाढ झाली असल्याने दाट धुक्यांमुळे पुण्यासह अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान या खराब हवामानाचा फटका विमानसेवेला बसला असून दृश्यमानता खालवल्याने देशभरातून पुण्याला येणारी अनेक विमाने रद्द करण्यात आली आहे. विमाने अचानक रद्द झाल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.
दरम्यान पुण्यातील लोहगाव विमानतळावर प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. गेल्या अनेक तासांपासून प्रवासी ताटकळत बसले आहेत. दाट धुके आणि खराब हवामानामुळे विमानसेवा रद्द करण्यात आल्याची माहिती विमान प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मागील दोन दिवसांपासून उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. राजधानी दिल्लीत धुक्यांची चादर पांघरली असून हवेतील दृश्यमानता खालावली आहे. धुक्यांची परिस्थिती पाहता पुण्यासह अनेक ठिकाणी रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
दिल्लीतील दाट धुक्यामुळे विमानसेवेच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी दृष्यमानता कमी झाल्यामुळे गुरुवारी पहाटेच्या सत्रात पटना, अहमदाबाद, पुणे, जयपूर आणि मुंबईसह अनेक शहरांमध्ये जाणारी विमानाचे अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहे. याशिवाय काही विमानांच्या उड्डाणाला विलंब होत आहे.
दरम्यान, देशातील अनेक शहरं सध्या धुक्याच्या विळख्यात आहेत. पुढील तीन दिवस धुके आणि थंडीची लाट कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.