विमान प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता विमान प्रवाशांना उड्डाणाआधी तासनतास ताटकळ बसण्याची गरज नाही. अनेकदा विमान उड्डाणाच्या बराच वेळ आधी प्रवाशांना विमानात वाट पाहत बसावं लागतं. विमानात बोर्डिंग झाल्यानंतर उड्डाणाला बराच विलंब होतो.
यादरम्यान, प्रवाशांना बाहेरही पडू दिलं जात नाही. मात्र, आता तुम्हाला फ्लाईटआधी बराच वेळ विमानात बसावं लागणार नाही. नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामुळे आता बोर्डिंग केल्यानंतर विमान टेक ऑफ करण्यास उशीर झाल्यास प्रवाशांना विमाना बाहेर पडता येईल.
नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. फ्लाईट बोर्डिंग केल्यानंतर बऱ्याच वेळा विमान टेक ऑफ करण्यास उशिर होतो, यादरम्यान प्रवाशांची मोठी गैरसोय होते. बोर्डिंग केल्यानंतर विमान उड्डाणाला विलंब झाल्याने प्रवासी विमानातच बराच वेळ अडकले जातात, त्यांना जागेवरून हलता येत नाही.
यामुळे काही प्रवाशांची आणि केबिन क्रूची भांडणं झाल्याची काही घटनाही समोर आल्या होत्या. अनेक प्रवाशांकडून विमान प्राधिकरणाला तक्रारी आल्या होत्या. आता मात्र, या तक्रारींची दखल घेत यावरुन BCASकडून प्रवाशांना दिलासा देण्यात आला आहे.
दरम्यान या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे प्रवाशांचा त्रास कमी होईल आणि विमानात चढल्यानंतर त्यांना जास्त वेळ बसावे लागणार नाही. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्याचा हा प्रयत्न आहे. देशातील देशांतर्गत हवाई वाहतूक वेगाने वाढत आहे आणि दररोज सुमारे 3,500 उड्डाणे जातात. BCAS आणि इतर प्राधिकरणांनी वाढत्या हवाई वाहतूक दरम्यान, विमानतळांवरील गर्दीचा सामना करण्यासाठी उपाययोजना करत अनेक पावले उचलली आहेत.