लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 15 जागांवर दिग्गजांचा पराभव,  नेमका कुठे दिग्गजांचा पराभव?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 15 जागांवर दिग्गजांचा पराभव, नेमका कुठे दिग्गजांचा पराभव?
img
Dipali Ghadwaje
गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला तब्बल 42 जागांवर यश आलं होतं. पण हाच आकडा 18 वर येऊन पोहोचला आहे. या निवडणुकीत महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे.  महाराष्ट्र भाजपला या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनाही या निवडणुकीत मोठा झटका बसला. कारण रावसाहेब दानवे यांचादेखील या निवडणुकीत पराभव झाला आहे. रावसाहेब दानवे हे भाजपचे खूप मोठे नेते आहेत. त्यांनी 1990 आणि 1995 मध्ये महाराष्ट्राची विधासभा निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 1999 पासून सलग 5 वेळा रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. पण यावेळी रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहे.  

नेमका कुठे दिग्गजांचा पराभव?
बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. पंकजा मुंडे यांना विजयाची खात्री होती. पण मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सकाळपासून बीडमध्ये अटीतटीची आकडेवारी समोर येत होती. रात्री शेवटच्या क्षणापर्यंत याबाबत सस्पेन्स कायम राहिला.  अखेर मतमोजणीच्या शेवटच्या 40 व्या फेरीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याची माहिती समोर आली.

भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. काँग्रेसचे कल्याण काळे यांनी त्यांचा पराभव केला. 

नाशिकमध्ये गेल्या दोन टर्मचे शिवसेनेचे खासदार असलेले उमेदवार हेमंत गोडसे यांचा दारुण पराभव झाला. ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी त्यांचा पराभव केला. शिंदे गटासाठी हा मोठा धक्का आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री भारती पवार यांचादेखील लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्करराव भगरे यांनी त्यांचा पराभव केला.

ठाकरे गटाला सुरुंग लावून तब्बल 13 खासदारांना फोडणारे नेते राहुल शेवाळे यांचादेखील या निवडणुकीत पराभव झाला आहे. राहुल शेवाळे हे लोकसभेत शिंदे गटाच्या खासदारांचे गटनेते बनले होते. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ही लढत झाली. ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांनी राहुल शेवाळे यांचा पराभव केला.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून खासदार असलेले शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा पराभव झालाय. ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्यांचा पराभव केला.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची निवडणूक देखील अटीतटीची ठरली. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा. पण यावेळी भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलं आणि ज्येष्ठ वकील उज्ज्व निकम यांना उमेदवारी दिली. अतिशय हायप्रोफाईल अशी ही लढत मानली जात होती. भाजपला या जागेवर जिंकून येण्याचा विश्वास होता. पण काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी उज्वल निकम यांचा अतिशय कमी मतांच्या फरकाने पराभव केला.

नंदुरबारमध्ये देखील भाजपला मोठा धक्का बसला आहे. नंदुबारमध्ये विद्यमान खासदार हिना गावित या विजयाची हॅटट्रीक मारण्यात यशस्वी होतात का? याबाबत सस्पेन्स होता. पण काँग्रेसच्या गोपाल पाडवी यांनी त्यांचा पराभव केला.

धुळे लोकसभा मतदारसंघातही भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण भाजपचे माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचा पराभव झाला आहे. सुभाष भामरे हे गेल्या 10 वर्षांपासून खासदार धुळ्याचे खासदार होते. पण त्यांचा अवघ्या तीन हजार मतांनी पराभव झाल्या. काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांचा इथे विजय झाला.

अमरावती लोकसभा मतदारसंघातही मोठी उलथापालथ झाली आहे. खासदार नवनीत राणा यांचा पराभव झाला आहे. इथे नवनीत राणा जिंकून येतील, अशी शक्यता होती. पण काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी त्यांचा पराभव केला आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली होती. पण काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांचा पराभव केला.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातही मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपचे उमेदवार तथा केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांचा इथे विजय झाला.
 
वर्धा लोकसभा मतदारसंघातदेखील मोठी उलथापालथ झाली आहे. गेल्या 10 वर्षांपासून भाजपचे खासदार असलेले रामदास तडस यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांनी पराभव केला.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातही भाजपला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रतिष्ठेला इथे मोठा धक्का बसला आहे. कारण शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव केला आहे.

सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांचा पराभव केला आहे. संजयकाका गेल्या 10 वर्षांपासून सांगली लोकसभा मतदारसंघात खासदार होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group