लोकसभा निवडणुकीत
लोकसभा निवडणुकीत "कुणाला दिलदार शत्रू मिळाले, तर कुणाला दिलदार मित्र मिळाले" पण माझ्यासारख्या....
img
Dipali Ghadwaje
सांगली लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. सांगलीत महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील, तर महायुतीकडून भाजपचे संजयकाका पाटील निवडणूकीच्या मैदानात होते.  सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यापासून ते प्रचारापर्यंत सर्वच स्तरांवर नाराजी नाट्य पाहायला मिळाले.

उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यापासून काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी होती. चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी प्रयत्नही करण्यात आले.  मात्र, काँग्रेसला त्यात यश आले नाही.

महाविकास आघाडीने तिकीट नाकारल्यानंतर अखेर इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आणि  निवडणूक लढवली आणि मोठ्या मतांनी विजय मिळवला आहे.  विशाल पाटील विजयी झाल्यानंतर एकच जल्लोष सांगलीत साजरा करण्यात आला. 

विशाल पाटील आता खासदार म्हणून लोकसभेत जाणार असून, दरम्यान पराभव पत्करावा लागल्यानंतर आता चंद्रहार पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली असून, यावरून आता तर्क-वितर्क लढवले जात आहेत. चंद्रहार पाटील यांचा रोख नेमका कुणाकडे आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

शेतकऱ्याच्या पोराला पराभूत करायला सर्वच एकत्र

चंद्रहार पाटील यांनी लिहिले आहे की, या निवडणुकीत कुणाला दिलदार शत्रू मिळाले, तर कुणाला दिलदार मित्र मिळाले. पण माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या पोराला पराभूत करण्यासाठी सर्वच सहकारी मित्र, एकत्र आले आणि शत्रू म्हणून समोर उभे राहिले. वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची आहे, उद्या माझी येईल, असे चंद्रहार पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. या सांगली लोकसभेच्या निवडणुकीत चंद्रहार पाटील यांना केवळ ६० हजार ८६० इतकी मते मिळाली आहेत. 

दरम्यान, सांगली लोकसभेसाठी यावेळी जवळपास ६१ टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये खरी लढत ही अपक्ष विशाल पाटील आणि भाजपचे संजयकाका पाटील यांच्यात झाली. विविध एक्झिट पोलमध्येही विशाल पाटील हेच आघाडीवर असल्याचे सांगितले गेले. अनेक ठिकाणी एक्झिट पोलचे अंदाज चुकले असले तरी सांगलीत मात्र ते खरे ठरले. विशाल पाटील यांना ०५ लाख ७१ हजार ६६६ मते मिळाली. तर भाजपाचे संजयकाका पाटील यांना ०४ लाख ७१ हजार ६१३ मते मिळाली. तब्बल ०१ लाख ५३ मतांनी विशाल पाटील यांनी विजय खेचून आणला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group