मोदी सरकारच्या तिसऱ्याकार्यकाळातील 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नवनिर्वाचित खासदार शपथ घेणार आहेत. त्यानंतर सभापतीपदासाठीही निवडणूक होणार आहे. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत.
18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. नवीन खासदार आज आणि उद्या शपथ घेतील. तत्पूर्वी, भाजप खासदार भर्तृहरी महताब यांना सोमवारी सकाळी १० वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रोटेम स्पीकरची शपथ दिली. यावेळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू राष्ट्रपती भवनात उपस्थित होते.
दुसरीकडे काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी प्रोटेम स्पीकरला विरोध केला आहे. विरोधकांचे म्हणणे आहे की सरकारने नियमांकडे दुर्लक्ष केले आणि भर्तृहरी महताब यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली. ते 7 वेळा खासदार आहेत, तर काँग्रेसचे के. सुरेश 8 वेळा खासदार आहेत. नियमानुसार काँग्रेस खासदाराला हंगामी स्पीकर बनवायला हवे होते.
राज्यसभेचे २६४ वे अधिवेशन २७ जूनपासून सुरू होणार आहे. त्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा-राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनातला संबोधन करतील. यानंतर पंतप्रधान मोदी बोलणार आहेत. हे पहिलेच अधिवेशन आहे, त्यामुळे मोदी सरकारही विश्वासदर्शक ठराव मागणार आहे.
अधिवेशनाच्या शेवटच्या दोन दिवशी सरकार राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव आणेल आणि त्यावर दोन्ही सभागृहात चर्चा होईल. 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना तीव्र विरोधाचा सामना करावा लागणार आहे. विरोधी पक्ष इंडिया ब्लॉकचे सर्व खासदार महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ जमतील आणि तेथून एकत्र सभागृहात जातील.
गेल्या आठवड्यात झालेल्या NEET परीक्षेतील गैरप्रकार, तीन फौजदारी कायदे आणि लोकसभा निवडणुकीनंतर शेअर बाजारातील अनियमितता या आरोपांवरून विरोधक यावेळी गदारोळ माजवू शकतात. त्यामुळे मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अधिवेशनात काय निर्णय घेतले जाणार याकडे सर्वांचे लागले आहे.