मुंबई : मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा निसटता पराभव झाला. मात्र या पराभवाआधी मतमोजणी केंद्रात नाट्यमय थरार रंगला.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या 26 फेऱ्या झाल्या. टपाल मतांची मोजणी झाल्यानंतर अमोल किर्तीकर यांना 4 लाख 52 हजार 596 मते मिळाली होती. तर रवींद्र वायकर यांना 4 लाख 52 हजार 644 मते मिळाली. मात्र अमोल किर्तीकर यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केली, ज्यामध्ये अमोल किर्तीकर एका मताने पुढे असल्याचे सांगण्यात आले. मात्र पुन्हा मतमोजणी झाल्यानंतर अखेर 48 मतांनी रवींद्र वायकर यांना विजयी घोषित करण्यात आले.
रवींद्र वायकर यांच्या विजयानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. ठाकरे गटाच्यावतीने आज राष्ट्रपती यांना पत्र लिहिण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे स्वत: निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत आक्षेप घेत राष्ट्रपतींकडे तक्रार करणार आहेत. राष्ट्रपतींना पत्र दिल्यानंतर दुपारी उद्धव ठाकरे दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणूक आयोगाकडून सुरुवातीला अमोल कीर्तिकर विजय असल्याची घोषणा मात्र रिकाऊंटिंगमध्ये पुन्हा रवींद्र वायकर विजयी असल्याचे घोषित केल्यानंतर ठाकरे गटाने ही भूमिका घेतली आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहेत. वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव केला. याआधी अमोल किर्तीकर 681 मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली. यामध्ये वायकर हे 75 मतांनी आघाडीवर आले. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. आता किर्तीकर यांच्या आक्षेपानंतर बाद करण्यात आलेल्या 111 पोस्टल मतांची फेरमतमोजणी करण्यात आली. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी 26 फेऱ्या आणि बाद करण्यात आलेल्या मतांची मोजणी करण्यात आल्यानंतर रविंद्र वायकर यांना 48 मतांनी विजयी झाल्याची घोषणा केली.