उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसाच्या बायकोने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली.
या व्हिडीओमध्ये तिने सासरची मंडळी कशापद्धतीने तिला त्रास देत आहेत हे सांगितले. बख्शी का तालाब पोलिस ठाण्यात या महिलेचा पती कार्यरत आहे. पोलिसाच्या बायकोने घरातील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सौम्या कश्यप असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तिचे लग्न अनुराग सिंह या पोलिसासोबत झाले होते. अनुराग सध्या बख्शी का तालाब पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत आहे. रविवारी सौम्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर आत्महत्या केल्याची माहिती मिळाली.
रडत रडत सौम्याने सासरचे लोक कशापद्धतीने छळ करत होते हे तिने सांगितले. तिने या व्हिडीओमध्ये तिला मारहाण केल्याचे व्रण देखील दाखवले आहेत. व्हिडीओमध्ये सौम्या म्हणते की, 'माझ्या सासरची लोकं माझ्या नवऱ्याचे दुसरे लग्न करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझा दीर वकील असून तो मला जीवे मारण्याची धमकी देत आहे. तू हिला मारून टाक आम्ही तुला वाचवू असे तो माझ्या नवऱ्याला म्हणतो. हे लोकं मला खूप त्रास देतात. मला सतत मारहाण करत आहेत.'
सौम्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्स करत संताप व्यक्त केला आणि तिच्या सासरच्या लोकांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आहेत.
सासरच्या लोकांकडून होणारा मानसिक त्रास आणि कुटुंबाकडून होणारा दबाव यामुळे चिंतेत आलेल्या सौम्याने घरातच गळफास घेत आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सौम्याच्या आई-वडिलांना घटनेची माहिती दिली. तिचे आई-वडील मैनपुरी जिल्ह्यात राहत असून मुलीच्या आत्महत्येमुळे त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी लखनऊ गाठत सौम्याच्या सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.