सोनिया दुहान यांनी ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याआधी मे महिन्याच्या अखेरिस त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला होता. सोनिया दुहान या शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जात होत्या तसेच त्या राष्ट्रवादीच्या लेडी जेम्स बाँड समजल्या जात होत्या.मात्र मी सुप्रिया सुळे यांच्यामुळे पक्ष सोडतेय’, असं ठामपणे सांगून शरद पवारांची साथ सोडली होती. जेव्हा त्यांनी पक्ष सोडला तेव्हा पक्षांतर्गत मोठी खळबळ माजली होती. दरम्यान आता सोनिया दुहान यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
२०२३ ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा मागे घेताना शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोनिया दुहान त्यांच्या मागेच बस्या होत्या. तेव्हापासून सोनिया दुहान नाव चर्चेत आलं. अजित पवारांच्या सकाळच्या शपथविधीलाही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, असं म्हटलं जातंय.
राष्ट्रवादीत असताना त्या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या. त्या मूळच्या हरियाणामधील हिसारच्या रहिवासी असून तिथंच शालेय शिक्षण झालंय. आता त्यांनी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेता भुपिंदर शुदा, हरियाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उदयभान चौधरी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यासंदर्भात त्यांनीच एक्सवरून माहिती दिली.
एक्सवरील पोस्टमध्ये सोनिया दुहान म्हणाल्या, आज दिल्लीत खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांच्या निवासस्थानी काँग्रेस पक्षाच्या नीतीला प्रभावित होऊन हरियाणा काँग्रेसचे प्रभारी दीपक बावरिया, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते भुपिंदर शुदा, हरियाणा काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष उदयभान यांच्या नेतृ्त्त्वाखाली विधानसभेच्या माझ्या समर्थकांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मिशन २०२४ च्या काँग्रेसला पाठिंबा देण्याचं काम करणार आहे. येणाऱ्या काळात हरियाणाच्या सर्व विधानसभेसाठी जुन्या सहकाऱ्यांना काँग्रेसमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे”, असं सोनिया दुहान म्हणाल्या.
कोण आहेत सोनिया दुहान
सोनिया दुहान यांनी कुरुक्षेत्र विद्यापीठातून बीएससी केलं असून वैमानिकाचं प्रशिक्षण घेण्याकरता त्या पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आल्या. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दिल्ली विद्यापीठात दोन निवडणुकांमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व केलं होतं. सोनिया दुहान राष्ट्रवादीच्या महासचिवही होत्या. युवक संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.