रोहित-युगेंद्र पवारांच्या जीवाला धोका, तातडीने सुरक्षा द्या - सुप्रिया सुळे
रोहित-युगेंद्र पवारांच्या जीवाला धोका, तातडीने सुरक्षा द्या - सुप्रिया सुळे
img
Dipali Ghadwaje
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपानंतर आता काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील काही जागांवर अद्याप एकमत होताना दिसत नाही. त्यातच दुसरीकडे मनसेच्या महायुतीतील सहभागावरून चर्चा सुरू आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार तसेच युगेंद्र पवार यांच्या जीविताला धोका आहे. त्यांना तातडीने सुरक्षा द्या, असे पत्र खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिसांना लिहिले आहे. 

आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या जीवाला धोका असून त्यांना तातडीने पोलिस संरक्षण द्या, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिस अधीक्षकांकडे पत्राद्वारे केली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना घेराव घातला होता. सोशल मीडियावर अजित पवार यांची बदनामी सुरू आहे, ती थांबवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. 

यावर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून काही चुका झाल्या असतील तर दुरुस्त करू, असे आश्वासन युगेंद्र पवार यांनी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दिले.
श्रीनिवास पवार यांनी लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याप्रकरणी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवारांना घेराव घालत जाब विचारला, असे सांगितले जात आहे. यावरून आता सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिसांना एक पत्र लिहून तातडीने सुरक्षा पुरवावी, अशी विनंती केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिसांना लिहिलेल्या पत्रात नेमके काय म्हटले आहे?

लोकसभा निवडणूक प्रचारार्थ आमदार रोहित पवार व युगेंद्र पवार हे दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी जात आहेत. संविधानिक पद्धतीने, शांतपणे व लोकशाही मार्गाने लोकांशी सुसंवाद साधत आहेत. परंतु काही ठिकाणी त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. काही लोक घेराव घालून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध वृत्तवाहिन्या व समाज माध्यमातून ही घटना सर्वांसमोर आली. संबंधितांची ही कृती पूर्णपणे असंविधानिक आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेद्वारा बहाल केलेल्या सर्वसामान्य नागरिकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारी आहे. आदरणीय स्व. यशवंतराव चव्हाण यांनी घडविलेल्या संवेदनशील महाराष्ट्रात असे घडणे शोभादायक नाही. या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झाला आहेत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ही अतिशय चिंतेची व गंभीर बाब आहे. सुसंस्कृत व विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे जिल्ह्यात हे अपेक्षित नाही. यामुळे आपणाकडून आमदार रोहित पवार व युगेंद्र पवार यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेऊन त्यांना आवश्यक ती सुरक्षा तातडीने पुरविण्यात यावी, ही विनंती आहे. आपण याबाबत विनाविलंब कार्यवाही कराल, असा विश्वास वाटतो. असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group