लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यभरात सर्वत्र निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. सर्व पक्षांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून जय्यत तयारी सुरू केली आहे. एकीकडे पक्ष सभा, दौरे, जागावाटप यांच्याच व्यस्त असतानाच दुसरीकडे चर्चा सुरू आहे ती म्हणजे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली उमेदवारी व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून जाहीर केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. सुळे यांनी शरद पवार, सोनिया गांधी आणि उध्दव ठाकरे यांच्या फोटोसह पक्ष आणि निवडणूक चिन्ह या स्टेटसमध्ये असल्याने त्यांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर केली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
बारामती मतदार संघातून त्यांनी स्वत:च आपली उमेदवारी घोषित केली आहे. आपल्या व्हॉट्सअॅपवर याबाबत एक स्टेटस अपलोड करत सुप्रिया सुळेंनी उमेदवारी जाहीर केली असल्याचं बोललं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळेंनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरेंचा फोटो आहे. तसेच पुढे सु्प्रिया सुळेंचा फोटो नाव आणि निशाणी देण्यात आलीये. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि निवडणूक निशाणी तुतारी फुंकणारा माणूस देखील आहे.
दरम्यान सुप्रिया सुळेंनी ठेवलेल्या स्टेटसनंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार त्याच असणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र अद्याप याबाबत महाविकास आघाडीकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
जर महाविकास आघाडीमधून बारामती मतदार संघात सुप्रिया सुळे असतील तर मग महायुतीकडून कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळेंनी मतदार संघातील विविध ठिकाणी जाऊन जाहीर कार्यक्रम घेत आहेत. अशातच महायुतीकडून सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा आहे. मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून आपल्या विकास कामांचा रथ देखील दाखवण्यात आला होता. त्यामुळे खरोखर आगामी निवडणुकीत नणंद आणि भावजय यांच्यात लढत पाहायला मिळणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.