पुणे : विधानसभा निवडणुकांसाठी दिग्गजांच्या प्रचारतोफा आजपासून धडाडायला सुरुवात झाली असून महाविकास आघाडीच्या मोठ्या सभेचं नियोजन आजच करण्यात आलंय. आज पुण्यातील एका सभेत बोलताना शरद पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ गुजरातच्याच विकासाचाच विचार करतात, गुजरातशिवाय त्यांना इतर राज्य दिसत नाहीत. म्हणूनच, आपल्या महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यात येत असल्याचं म्हणत शरद पवारांनी मोदींवर नाव न घेता हल्लाबोल केला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रातील सभांना 8 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे, पुढील काही दिवसांत राज्यातील राजकीय वातावरण तापणार असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणात झडल्या जाणार आहेत.
माझ्याकडे जेव्हा राज्य होतं तेव्हा मी पुण्याचा विचार केला होता, कारण फक्त शेतीवर सगळं होणार नाही. पण, या सरकारने काय जादू केली माहिती नाही, टाटा एरबसचा कारखाना नागपूरवरुन गुजरातमध्ये नेला. सेमी कंडक्टरचा एक कारखाना ज्याचे नाव वेदांता फॉक्सॉन आहे, हा कारखाना सुद्धा गुजरातमध्ये गेला. जर, एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा, अशा शब्दात शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.