सातारा : राज्यात लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजप आमने सामने आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे भाजपनं सातारा लोकसभा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जागा वाटपाच्या तडजोडीतून आपल्याकडे घेत राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिलेली आहे.
उदयनराजे भोसले आणि सांगलीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कराडमध्ये सभा होणार आहे. तर, शरद पवार देखील साताऱ्याच्या दौऱ्यावर असून ते शशिकांत शिंदे यांच्यासाठी सभा घेणार आहेत.
महायुतीच्या जागावाटपात सातारा आणि सांगली लोकसभा मतदारसंघ भाजपकडे आहे. साताऱ्यातून राज्यसभा उमेदवार उदयनराजे भोसले आणि सांगलीतून संजयकाका पाटील लोकसभेच्या रिंगणात आहेत.
संंजयकाका पाटील तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात आहेत. उदयनराजे भोसले भाजपकडून दुसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. सातारा आणि सांगली लोकसभेच्या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची कराडमध्ये सभा होणार आहे. या सभेला सातारा लोकसभा मतदारसंघातील तसेच सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि महायुतीच्या घटकपक्षांचे नेते कार्यकर्ते उपस्थित राहतील.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून सातारा लोकसभा मतदारसंघात विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी शरद पवार आज साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांची सभा वाई तालुक्यात होणार आहे.