जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये संघर्ष शिगेला पोहचला आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात असतानाच क्वेटामध्ये दहा पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झालाय.
क्वेटा पाकिस्तानी सैनिकांवर आयईडी हल्ला करण्यात आला. यामध्ये १० पाकिस्तानी सैनिकांचा जागीच मृत्यू झाला. बलुच लिबरेशन आर्मीने आज पाकिस्तान सैनिकांवर आयईडी हल्ला केला होता.
पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा एका भीषण आयईडी हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे १० सैनिक ठार झाले. बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. क्वेटाच्या मार्गट उपनगरात पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर बीएलएने रिमोट-कंट्रोलने आयईडी स्फोट घडवून आणला.
बीएलएच्या प्रवक्त्या जियंद बलुच यांनी सांगितले की, क्वेटा येथे पाकिस्तानी सैनिकांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात लष्कराचे वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. त्या वाहनातील १० सैनिक ठार झाले. शहजाद अमीन, नायब सुबेदार अब्बास, शिपाई खलिल, शिपाई झाहिद, शिपाई खुर्रम सलीम यांचा समावेश आहे.
दरम्यान, बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान सैनिकांवर हल्ला झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. पाकिस्तानी सैनिकांवरील हल्ल्याने बलुचिस्थानमध्ये अद्याप अस्थिर परिस्थिती असल्याचे स्पष्ट झालेय. बलुच लिबरेशन आर्मीने याआधी जाफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण केले होते.
बलुच लिबरेशन आर्मीकडून पुढील काही दिवसांत आणखी हल्ले करण्यात येणार असल्याचा थेट इशारा दिला आहे. बलुचिस्थानमधील हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सुरक्षा आणखी वाढवण्यात आली असून तपास करण्यात येत आहे. पाकिस्तान आणि बीएलए यांच्यातील संघर्ष तीव्र झालाय.