मोठी बातमी : भाजपकडून जम्मू-काश्मीरसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर
मोठी बातमी : भाजपकडून जम्मू-काश्मीरसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : जम्मू- काश्मीरमध्ये पाच वर्षानंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमिवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत पहिल्या टप्प्यासाठी १५, दुसऱ्या टप्प्यासाठी १० आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी १९ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.

विशेष बाब म्हणजे माजी उपमुख्यमंत्री आणि जम्मू-काश्मीर विधानसभेचे माजी अध्यक्ष डॉ. निर्मल सिंह यांना भाजपाकडून तिकीट मिळालेले नाही. २०१४ मध्ये बिलवार विधानसभा मतदारसंघातून निर्मल सिंह विजयी झाले होते. तसेच, या यादीत काश्मीर खोऱ्यातील दोन जागांवर भाजपने काश्मिरी पंडित यांना उमेदवारी दिली आहे. वीर सराफ यांना शांगस-अनंतनाग पूर्व आणि अशोक भट्ट यांना हब्बाकडलमधून उमेदवारी देण्यात आली आहे.


दरम्यान, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसंदर्भात रविवारी नवी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते.

या बैठकीत निवडणुकीची रणनीती, मुद्दे, उमेदवारांची नावे आणि नरेंद्र मोदींच्या राज्यातील संभाव्य सभा यांवर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच, या बैठकीनंतर आज भाजपकडून जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. जम्मू-काश्मीरच्या ९० सदस्यीय विधानसभेसाठी १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. तर ४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. 

 
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group