नंदनवनात मतदानाचा बहर, ५९ टक्के मतदान
नंदनवनात मतदानाचा बहर, ५९ टक्के मतदान
img
Dipali Ghadwaje
दहा वर्षांनंतर होत असलेल्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचे मतदान बुधवारी शांततेत झाले. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एकूण ५९ टक्के मतदान झाले.

कडेकोट बंदोबस्तात सकाळी सातपासून मतदानाला सुरवात झाली. या पहिल्या टप्प्यात ६४ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले. कलम ३७० रद्द केल्यानंतर आणि पूर्वीच्या राज्याचे लडाख आणि जम्मू-काश्मीर या दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन केल्यानंतर येथे प्रथमच विधानसभा निवडणूक होत आहे.

पहेलगाम, दमहल हाजी पोरा, दुरू आणि कोकेनर्ग येथे मतदानासाठी नागरिकांनी उत्साह दाखविला. त्राल येथे सुरुवातीला मतदानाचा उत्साह कमी होता. मात्र सायंकाळी रांगा दिसल्या. केंद्रशासित प्रदेशातील सात जिल्ह्यांतील २४ मतदारसंघांत मतदान झाले. 

दरम्यान, पहिल्या टप्प्यात ३५ हजाराहून अधिक काश्मिरी पंडितांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी २४ मतदान केंद्रांची सोय करण्यात आली होती. दक्षिण काश्मीरमधील १६ मतदारसंघांमध्ये विस्थापित पंडितांची मतदार म्हणून नोंदनों णी करण्यात आली आहे. दहा वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होत असल्याने, पहिल्या टप्प्यात उत्साही मतदारांनी चिनाब खोऱ्यातील मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दोडा, किश्तवाड व रामबन जिल्ह्यांतील जवळपास सर्व केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या.

अनंतनाग, पुलवामा, कुलगाम आणि शोपियाँ चार जिल्ह्यांचा या पहिल्या टप्प्यात समावेश होता. चिनाब खोऱ्यातील आठ विधानसभा मतदारसंघात उभारलेल्या एक हजार ३२८ मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजता मतदान सुरू झाले. यावेळी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कारण गेल्या तीन महिन्यांत या भागात दहशतवादी हल्ल्यांत वाढ झाली आहे. त्यात लष्कराचे सहा जवान आणि चार दहशतवादी ठार झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष विकार रसूल वणी, माजी मंत्री आणि 'नॅशनल कॉन्फरन्स'चे उमेदवार सज्जाद अहमद किचलू यांनी सकाळी मतदान केले. तर पहिल्या टप्प्यातील भाजपच्या एकमेव महिला उमेदवार शगुन परिहार यांनीही मतदानाचा हक्क बजावला. पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

उच्चांकी मतदानाची नोंद

या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी एकूण सुमारे ५९ टक्के मतदान झाले. अलिकडच्या निवडणुकांमधील हे सर्वाधिक प्रमाण असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी पी. के. पोळ यांनी दिली. राज्यात मतदान शांततेत पार पडले. ही आकडेवारी बदलू शकते. कारण दुर्गम भागातील मतदानाची आकडेवारी आणि टपाली मतदानाची आकडेवारी अजून मिळायची असल्याने या टक्केवारीत काही प्रमाणात वाढ होऊ शकते, असे ते म्हणाले.


किश्‍तवाडला सर्वाधिक

किश्तवाड जिल्ह्यात सर्वाधिक ७७ टक्के मतदान झाल्याची नोंदनों झाली, तर पुलवामा जिल्ह्यात सर्वात कमी ४६ टक्के मतदान झाले. २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी उर्वरित दोन टप्प्यांतही उच्चांकी मतदान होईल, अशी अपेक्षा पोळ यांनी व्यक्त केली.

तुलबाग-रल्लू येथे मतदान केल्यानंतर काँग्रेस नेते वणी यांनी सांगितले, की जम्मू-काश्मीरमध्ये दहा वर्षांच्या दीर्घ काळानंतर विधानसभा निवडणुका होत आहेत यात चूक कोणाची आहे? याला भाजप जबाबदार आहे. अन्यथा निवडणुका २०१९ मध्येच व्हायला हव्या होत्या. माजी मंत्री वनी यांनी २००८ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बनिहालची जागा जिंकली होती आणि यावेळी ते विजयाच्या 'हॅटट्रिक'च्या प्रयत्नांत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group