काश्‍मीरमध्ये अखेर हिम‘चैतन्य’वर्षाव; पर्यटकांनी गजबजली पर्यटनस्थळे
काश्‍मीरमध्ये अखेर हिम‘चैतन्य’वर्षाव; पर्यटकांनी गजबजली पर्यटनस्थळे
img
Dipali Ghadwaje
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील नागरिक आणि येथे आलेले पर्यटक ज्याची आतुरतेने वाट पाहात होते त्या हिमवर्षावाला जम्मू-काश्‍मीरमध्ये गुरुवारी सुरुवात झाली. मागील दोन महिन्यांपासून जम्मू-काश्‍मीरमधील स्थानिक नागरिक हिमवृष्टीची वाट पाहात होते. गुरुवारी झालेल्या हिमवर्षावामुळे स्थानिकांना दिलासा मिळाला असून येथे ‘हिमचैतन्य’ निर्माण झाले आहे.

हिमवर्षाव आणि पाऊस न झाल्याने येथील फलोत्पादन आणि शेतीवरही परिणाम होण्याची शक्यता होती. हिमवर्षाव झाल्यामुळे येथील नागरिकांना मध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच हिमवर्षावामुळे येथील गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम ही पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत.

दरम्यान, जम्मू-श्रीनगर महामार्गावर ठिकठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आला आहे. 

हिमवर्षाव न झाल्याने स्कीइंग आणि बर्फातील अन्य खेळांचा आनंद स्थानिकांना आणि पर्यटकांना घेता येत नव्हता मात्र गुरुवारी सुरू झालेल्या हिमवर्षावामुळे आता पर्यटकांना या क्रीडा प्रकारांचा अनुभव घेता येणार आहे.

त्याचप्रमाणे येथील महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या क्रीडा सामन्यांनाही आता सुरुवात होणार आहे. पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेल्या व्यावसायिकांनी देखील हिमवर्षावाला सुरुवात झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

काश्‍मीरमध्ये होणाऱ्या बर्फवृष्टीचा येथील पर्यटनावर मोठा परिणाम होते त्याचप्रमाणे येथील अर्थकारणही यावर अवलंबून असते. यंदा हिमवर्षावाला उशीर झाल्याने जम्मू-काश्‍मीरमधील नागरिक चिंतेमध्ये होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group